नवी दिल्ली : पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर येथील कबर नष्ट करा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. तसेच ही वारसा स्थळे केवळ आपल्या गुलामगिरीची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नरेश म्हस्के म्हणाले की, "पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वर्षांचे आपण गेली ७५ वर्ष ऐतिहासिक या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या संरक्षणाखाली ३ हजार ६९१ स्मारक आहेत. परंतू, यापैकी २५ टक्के स्मारकांना कुठलाही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक संदर्भ आणि महत्त्व नाही. भारताच्या सांस्कृतिक बौद्धिक आणि नैसर्गिक धार्मिक संपदेवर क्रूर हल्ले करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे स्वराज्याचे स्वप्न वारंवार भंग करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
हे वाचलंत का? - संजय राऊत यांना प्रशासकीय कामकाजा अनुभव नसल्याने...; मंत्री संजय शिरसाट यांची घणाघाती टीका
"ज्या क्रूरकर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी अतोनात छळले, लाखो हिंदू धर्मीयांची कत्तल आणि छळ केला, हजारो मंदिरे आणि बौद्धिक संपदा उध्वस्त केली, धर्मांतरासाठी शिखांचे नववे धर्मगुरू तेज बहादुर सिंग यांना चांदणी चौकात मारले, दहावे धर्म गुरु गुरुगोविंद सिंग यांच्या दोन्ही मुलांना चार भिंतीआड मारले अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील खुलताबादला आहे. त्या कबरीचे संरक्षण ए सआय करीत असून ही बाब अत्यंत संताप जनक आणि लज्जास्पद आहे," असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
७५ वर्षानंतरही ७५ कबरीचे ओझे!
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण ऐतिहासिक वर्षांचा रक्षण करण्याच्या नावाखाली वसाहतवादी भूतकाळाचे ओझे वाहून नेत आहोत. या संरक्षित स्मारकांमध्ये ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या ७५ कबरी आहेत ज्यांचा भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीशी काहीही संबंध नाही. भारताला गुलाम बनवणाऱ्या आणि आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांवर अत्याचार करणाऱ्यांच्या आठवणी आपण आपला वारसा म्हणून जपतो, हे योग्य आहे का? ही वारसा स्थळे केवळ आपल्या गुलामगिरीची आठवण करून देतात. ती त्वरित बदलून भारतीय वीरांच्या वारशांचे जतन केले पाहिजे," असे त्यांनी सांगितले.