‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

13 Mar 2025 14:17:41

Devendra Fadanvis on Maharashtra Bhushan Award 2024
 
मुंबई: ( Devendra Fadanvis on Maharashtra Bhushan Award 2024 ) ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
विधानभवन येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य अॅड. उज्ज्वल निकम, वासुदेव कामत, गो. ब. देगूलकर, डॉ. शशिकला वंजारी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024’ पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेवून असून लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील.
 
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबत सादरीकरण केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य यांनी पुरस्कारासाठी निवड याबाबत मते मांडली.
 
Powered By Sangraha 9.0