बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर कट्टरपंथींचा उन्माद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. हिंदू अल्पसंख्याक आणि विशेषतः हसीना समर्थक तसेच, अवामी लिगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यास कट्टरपंथींनी सुरुवात केली. एखाद्या हॉलीवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटाची कथा चोरून आपला नवीन चित्रपट तयार करायचा, ही ‘टेक्निक’ तशी चित्रपटसृष्टीत जुनीच. अशाच पद्धतीने बांगलादेशातील स्टोरी एकाअर्थी चोरण्याचा प्रकार सीरियातही झाल्याचे दिसते.
सीरियातील लताकिया आणि तारतूसमध्ये सुरक्षा दल आणि असद समर्थक असलेला ‘अलावाइट’ समुदाय यांच्यात सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स’च्या मते, दि. ६ ते दि. १० मार्च रोजी दरम्यान झालेल्या हिंसाचारात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच या भागात ७२ तासांपासून पाणी आणि वीजपुरवठा पूर्णपणे बंद आहे. २०११ सालच्या गृहयुद्धानंतर मृत्यूचा हा आकडा सर्वाधिक मानला जातो आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सत्तापालट केल्यानंतर बशर अल असद देश सोडून रशियात पळाले. यानंतर ‘हयात तहरीर अल-शाम (एचटीएस)’ने सीरियातील सत्ता ताब्यात घेतली. ‘एचटीएस’चे लढवय्ये सध्या सीरियन लष्कराचाच भाग आहेत. सीरिया सरकारचे म्हणणे आहे की, असद यांच्या निष्ठावान सैनिकांनी सुरक्षा दलांवर जेव्हा हल्ला केला, त्यानंतरच हिंसाचाराची ठिणगी पेटली. असदच्या सैनिकांनी सुरक्षा दलांवर निवासी भागात बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला आहे. जेव्हा सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. त्यानंतर सरकारने लताकिया आणि तारतूसमध्ये प्रचंड सुरक्षा दल तैनात केले आणि कर्फ्यूचे आदेश दिले. सद्यस्थिती पाहिली तर, ‘अलावाइट’ समुदायाच्या लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे. रस्त्यांवरही अक्षरशः मृतदेहांचा खच पडलेला आहे.
वास्तविक ‘अलावाइट’ समुदाय हा असद समर्थक. कारण, असद हे स्वत:देखील याच समाजाचे. त्यांच्या वडिलांची सत्ता येताच, त्यांनी मोठ्या संख्येने ‘अलावाइट’ समुदायातील लोकांना सरकारी आणि लष्करी पदांवर नियुक्त केले. तेव्हा ‘अलावाइट’ समुदायाची लोकसंख्या १२ टक्के, तर सुन्नींची लोकसंख्या ७४ टक्के होती. असे असतानाही, ‘अलावाइट’ समुदायास सत्ता आणि संसाधनांमध्ये मोठा वाटा मिळू लागला. यामुळे बहुसंख्य सुन्नी समाज अल्पसंख्याक ‘अलावाइट’ समाजावर तेव्हापासूनच नाराज आहे. असद सरकारची राजवट धर्मनिरपेक्ष होती. त्यामुळे सुन्नी धार्मिक नेते आणि कट्टरवादी गट असदच्या विरोधात गेले. सुन्नी समाजातील अनेक वर्ग ‘अलावाइट’ मुस्लिमांना धर्मापासून दूर गेलेले मानतात. असद सरकारच्या काळात सीरियातील मशिदी सरकारी नियंत्रणाखाली होत्या आणि सुन्नी धर्मगुरूंना सरकारवर टीका करण्याची परवानगीसुद्धा नव्हती.
सीरियामधील १९७१ सालापासून असद कुटुंबाची घराणेशाही डिसेंबर २०२४ साली संपुष्टात आली. अहमद अल-शरा यांच्या नेतृत्वाखालील इस्लामी गट ‘हयात तहरीर अल शाम’ने असद यांना सत्तेवरून हटवून अंतरिम सरकार स्थापन केले. आता बशर अल असदचे निष्ठावंत सैनिक नवीन सरकारच्या सुरक्षा कर्मचार्यांशी आणि ‘एचटीएस’च्या लढवय्यांशी संघर्ष करीत आहेत. सुरक्षा कर्मचारी आणि ‘एचटीएस’च्या सैनिकांनी ‘अलावाइट’ समुदायाचे लोक राहत असलेल्या भागांना लक्ष्य केले आहे. याठिकाणी अगणित रक्तपात होत असून, त्याचा सर्वाधिक फटका या समाजाला बसला आहे. देशातील अस्थिरतेच्या दरम्यान सुन्नी समुदाय ‘अलावाइट’वर वर्चस्व गाजवू लागला आहे. असदच्या काळात झालेल्या अन्यायाचा बदला तो सामान्य ‘अलावाइटा’वर हिंसाचाराने घेत आहे.
एकूणच काय तर बांगलादेश असो वा सीरिया, याठिकाणी असलेले अल्पसंख्याक समुदाय स्वतःला या देशात असुरक्षित समजू लागले आहेत. मात्र, भारत हा असा देश आहे, जिथे अल्पसंख्याकांना कधीच असुरक्षिततेची भीती वाटली नाही किंवा भारताने त्यांना कधी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उलट तोही भारताचाच नागरिक आहे, या विचाराने अल्पसंख्याक समुदायाची काळजी घेतली. बांगलादेश आणि सीरियाने भारताचा हा गुण आत्मसात करावा, हीच अपेक्षा.