भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
नाशिक शहरातील काही तरुण भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी धडपडत होते. मात्र, त्यासाठी एखादे व्यासपीठ किंवा संस्थेची आवश्यकता त्यांना भासली. या गरजेतून जन्म झाला ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’ या संस्थेचा. २०२० साली गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संस्थेची स्थापना, तर २०२१ साली वसंत पंचमीच्या मुहूर्तावर अधिकृत नोंदणी करण्यात आली. ‘इरा’ म्हणजे काय, असा प्रश्न आपल्याला सहज पडतो. तर ‘इरा’ म्हणजे सरस्वती, जी ज्ञान, साहित्य, भाषा, कला आणि शास्त्र यांची अधिष्ठात्री आहे. ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’ भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करते. संस्थेने आतापर्यंत विविध सामाजिक, पर्यावरणीय व वैयक्तिक विकास घडविणारे उपक्रम राबविले असून नाशिककरांनी प्रत्येक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
भविष्यात भारतीय संस्कृती आणि परंपरा समजून घेण्यासाठी विविध कार्यशाळा आणि अभ्यासवर्गांचे आयोजन संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, ज्ञानवर्धन, कौशल्यवर्धन, ऐतिहासिक वारसा जतन आणि नव्या पिढीला त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न संस्था करणार आहे. सामाजिक भान जपणे, नवीन पिढीच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे आणि भारतीय संस्कृती, सण, ऋतू, आहार-विहार यांची माहिती देऊन नागरिकांमध्ये अधिकाधिक जागरूकता निर्माण करणे या संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी म्हणता येतील. रामनवमी हा श्रीरामाचा जन्मोत्सव आहे आणि हा हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या सणानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रामनवमीच्या पूर्वसंध्येला ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’तर्फे रामरक्षेचे सामूहिक पठण आयोजित करण्यात येते. तसेच, रामरक्षेच्या श्लोकांचे सार्थ निरूपण केले जाते.
संस्कृत ही पृथ्वीवरील प्राचीन, समृद्ध, सर्वांत शास्त्रीय भाषा मानली जाते. वाचून संस्कृत श्लोक म्हणतानादेखील त्यांचा योग्य उच्चार होणे गरजेचे आहे. यासाठी अचूक उच्चारणाचे नियम आणि काही मूलभूत व्याकरण माहीत असणे आवश्यक आहे. याचसाठी ‘इरा’द्वारा ऑनलाईन संस्कृत पठण अभ्यासवर्ग आयोजित केले जातात. या वर्गात सरावाद्वारे अचूक आणि योग्य रितीने संस्कृत श्लोक म्हणणे सोपे होते. तसेच, संस्कृत वर्णमाला आणि वर्णांचे उच्चार, संधी, संधीचे प्रकार, संस्कृत वाचण्यासाठी आवश्यक सोपे व्याकरण, पठणाचा वैयक्तिक सराव अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात.
रामरक्षेच्या नित्य पठणाने बुद्धीला तेज, वाणीला शुद्धता आणि मनाला प्रसन्नता मिळते आणि रामचंद्रांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वातील गुण नकळत अंगी रुजतात. म्हणून या रामरक्षेचे काही वेगळे पैलू अभ्यासण्यासाठी ‘इरा’तर्फे ऑनलाईन रामरक्षा अभ्यासमाला आयोजित केली जाते. यात संस्कृत वर्णमाला, वर्णांचे व विसर्गाचे उच्चार, प्रत्येक श्लोकाचे अचूक आणि शुद्ध उच्चारण, रामरक्षेतील श्लोकांचा भावार्थ आणि गूढार्थ, रामरक्षेच्या माध्यमातून विभक्ती, संधी, वृत्त इत्यादी संस्कृत व्याकरणाचा स्वल्पपरिचय, रामरक्षेचे पुरश्चरण आणि फलश्रुती, नित्य पठणातून संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि आरोग्यदृष्ट्या प्रभाव या गोष्टींची माहिती दिली जाते. संस्था उन्हाळी सुटीनिमित ‘संस्कृत समर कॅम्प’चे आयोजन करते. यात धमाल करता करता संस्कृत बोलायला शिकवले जाते. सोबत संस्कृत गाणी, गोष्टी आणि संस्कृत खेळसुद्धा खेळले जातात. ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’ ही भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार करण्यासाठी समर्पित असलेली एक संस्था आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद गर्भे (८८०५७०११४२) यांच्याशी संपर्क साधावा.
‘मेघदूत - नेचर वॉक’मधून निसर्गाची अनुभूती
आषाढ प्रतिपदा अर्थात महाकवी कालिदास दिन. म्हणजे मेघदूतातील निसर्ग अनुभवण्याचा दिवस. पण मेघदूत अनुभवायला थेट निसर्गातच जाऊन पावसात भिजण्याशिवाय पर्याय नाही. याचसाठी ‘इरा’ संस्थेतर्फे ‘मेघदूत - नेचर वॉक’ आयोजित केला जातो. त्र्यंबकेश्वरजवळच्या निसर्गात सोल्या डोंगर, त्र्यंबक-घोटी रोड इथे जात डोंगराला धडकणारे ढग, खळखळणारे झरे, उडणारे पक्षी, विविध झाडे, फुले-पाने असे मेघदूतात केलेले वर्णन प्रत्यक्ष बघत मेघदूतातील श्लोकांचा आस्वाद यानिमित्ताने घेता येतो. निसर्ग अभ्यासासह यावेळी शास्त्रीय माहितीदेखील दिली जाते.
गोदावरी जयंतीनिमित्त गोदाकाठी वारसा फेरी
माघ शुक्ल दशमी हा गोदावरीचा अवतरण दिन मानला जातो. यानिमित्ताने ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’द्वारे गोदाकाठी ‘गोदा संवाद’ अर्थात ‘वारसा फेरी’चे आयोजन करण्यात येते. नाशिककरांसाठी गोदावरी ही फक्त एक नदी नसून नाशिकची संस्कृती, परंपरा, भूगोल आणि इतिहास या सार्यांची ती जीवनरेखा आहे. गोदाकाठी नाशिक वसले, विस्तारले, विकसित झाले. नाशिक आणि गोदामाईचे हे अजोड नाते मांडणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. कपूरथळा स्मारकापासून सुरू होऊन विविध मंदिरे, रामकुंड परिसर, गंगा-गोदावरी मंदिर, पाराशरे यांचे गोदावरी मंदिर या मार्गाने जात नारोशंकर मंदिर येथे या वारसा फेरीचा समारोप होतो. नाशिकच्या इतिहास व वारशावर विनय जोशी, अनिता जोशी, अनिकेत गाढवे, प्रसाद गर्भे आदि मान्यवर मार्गदर्शन करतात. या उपक्रमाला नाशिककरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
आद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शंकरं लोकशंकरम्’
वैशाख शुद्ध पंचमी हा भगवत्पाद आद्य शंकराचार्यांचा अवतरण दिन. जेव्हा भारतीय संस्कृतीसाठी आध्यात्मिक अराजकतेचा, धार्मिक संभ्रमाचा काळ चालू होतो, पंथापंथात वितुष्ट होते, जेव्हा नास्तिक आणि पाखंडी विचारांचे आकर्षण वाढत होते. भक्तिमार्गात अवडंबर माजले होते, ज्ञानमार्ग तर्कशुष्क झाला होता, योगमार्ग म्हणजे चमत्कारांचे खेळ झाले होते. तेव्हा आद्य शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण करत विविध पंथांत समन्वय साधला. नास्तिक मताचे खंडन करून अद्वैत मताचा प्रचार केला आणि देशाच्या चार टोकांना चार पीठांची स्थापना केली, असे भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थापक, हिंदू धर्मातील एक महान संत आणि तत्त्वज्ञ म्हणजे जगद्गुरू आद्य शंकराचार्य. म्हणूनच आद्य शंकराचार्यांच्या जीवन आणि शिकवणींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांना आदरांजली म्हणून ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’तर्फे श्री आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त ‘शंकरं लोकशंकरम्’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आद्य शंकराचार्यांचे भारतीय संस्कृतीसाठीचे हे योगदान, त्यांचे जीवनकार्य, अद्वैत वेदांताचा प्रचार आणि भक्तिमार्गाचा विस्तार यांचा आढावा ‘शंकरं लोकशंकरम्’ या कार्यक्रमात घेतला जातो. आद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा एक अभिवाचन कार्यक्रम आहे. यात आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग अभिवाचनातून सादर केले जातात. तसेच, त्यांनी रचलेल्या काही स्तोत्रांचे गायनदेखील केले जाते. आचार्यांच्या याच अलौकिक चरित्राचे चिंतन करत शब्दसुमनांनी त्यांचे पूजन करण्यासाठी या कार्यक्रमाला नाशिककरही मोठी गर्दी करतात. विशेष म्हणजे, आद्य शंकराचार्यांच्या अवतरण दिनीच नव्हे, तर अनेक ठिकाणी विविध औचित्यानेदेखील या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
‘इरा सेंटर’चे प्रमुख उपक्रम
- संस्कृत संभाषण वर्ग
- संस्कृत भाषा शिक्षण
- गणपती अथर्वशीर्ष पठण वर्ग
- श्रीसूक्त पठण वर्ग
- संस्कृत पठण कार्यशाळा
- गणेशपूजन कार्यशाळा
- नित्य देवपूजन कार्यशाळा
- भारतीय खगोलशास्त्र अभ्यास वर्ग
- निशुल्क कुंकूमार्चन साधना
- निशुल्क सरस्वती पूजन साधना
- वसंतोत्सव
- गोदा संवाद - वारसा फेरी
- संस्कृत समर कॅम्प
- मेघदूत - नेचर वॉक
- शंकरं लोकशंकरम् अभिवाचन
संस्थेची टीम
- विनय जोशी
- अनिता जोशी
- डॉ. स्नेहल दंताळे
- अनिकेत गाढवे
- प्रसाद गर्भे