नवी दिल्ली: ( india on trade tariff reduction for USA )“भारताने अमेरिकेला व्यापार शुल्क कमी करण्याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही,” अशी माहिती वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवार, दि. 10 मार्च रोजी संसदीय समितीला दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारताने त्यांचे शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. या दाव्याला उत्तर म्हणून बर्थवाल यांचे हे विधान आले आहे.
परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय समितीला माहिती देताना वाणिज्य सचिवांनी स्पष्ट केले की, “भारत आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि कोणताही व्यापार करार अंतिम झालेला नाही. भारताने शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडच्या दाव्यावर संसदीय समितीच्या अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापार कराराची चर्चा अजूनही सुरू असल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दाव्यांवर आणि माध्यमांच्या वृत्तांवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही.
भारताने अमेरिकेला व्यापार शुल्काबाबत काहीही वचनबद्धता दर्शवलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. “देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत कर कमी करणार नाही,” असे बर्थवाल यांनी सांगितले. “राष्ट्रीय हित जपले जावेत, याची खात्री करण्यासाठी भारत बहुपक्षीयऐवजी द्विपक्षीय करकपातीची वाटाघाटी करण्यास प्राधान्य देतो,” असे बर्थवाल यांनी सांगितले.