स्वयं पुनर्विकास हे मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल

12 Mar 2025 16:08:28
 
Deputy Chief Minister Eknath Shinde at the inauguration ceremony of Mumbai Bank abudaynagar
 
मुंबई -  ( Deputy Chief Minister Eknath Shinde at the inauguration ceremony of Mumbai Bank abudaynagar ) स्वयं पुनर्विकास योजना मुंबई बँकेने आणलेय. सर्वसामान्यांना घर मिळवून देण्यासाठी मुंबई बँकेने जे काम केलेय त्याला तोड नाही. स्वयं पुनर्विकास हे मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल. अन्य बँकांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. तसेच अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासातील ज्या अडीअडचणी आहेत त्या सरकार दूर करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई बँकेच्या अभ्यूदय नगर येथील शाखेचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी आमदार प्रसाद लाड, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, संदीप घनदाट, विष्णू घुमरे, आनंदराव गोळे, मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांसह मोठ्या संख्येने सहकारातील पदाधिकारी, अभ्यूदय नगर मधील नागरिक उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करत म्हटले कि, येथे अभ्यूदय नगरचा पुनर्विकास हा महत्वाचा विषय आहे. आम्ही गेली अडीच वर्ष सरकार चालवले. एक टीम म्हणून काम केले. राज्याला विकासाकडे नेण्याचे काम केले. अनेक योजना केल्या. माझे जिथे असेल तिथून काम चालू असते. सरकार सर्वसामान्यांचे आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात उठाव, संघर्ष पहिला. जगातील ३३ देशांनी याची दखल घेतली. राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींचे आम्ही भाऊ झालो हे पद महत्वाचे आहे. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही पण जनतेला सोन्याचे दिवस दाखवण्यासाठी जन्माला आलो हे महत्वाचे.
 
विधानसभेत दैदिप्यमान यश मिळवून दिलात.मुंबई बँक सर्वांना आपली वाटणारी बँक आहे. हा विस्तार नाही तर ग्राहकांचा विश्वास आहे. बँकेच्या यशाबद्धल बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकरांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. प्रविण दरेकर बँकेचे कॅप्टन आहेत. बँक चालवताना कष्ट मेहनत घ्यावी लागते. ग्राहकांच्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरलात. मुंबई च्या विकासात सफाई कामगारांपासून उद्योगपतीपर्यंत सर्वांचा सहभाग आहे. मुंबई बँक गोरगरीबांची आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम बँकेने केलेय.
 
लाडक्या बहिणींची काळजी घेतली म्हणून मुंबई बँक आमची लाडकी बँक आहे. मुंबई बँकेने दिलेले योगदान सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवीणारे आहे. स्वयं पुनर्विकास योजना मुंबई बँकेने आणलेय. सर्वसामान्यांना घर मिळवून देण्यासाठी मुंबई बँकेने जे काम केलेय त्याला तोड नाही. मुंबईत अनेक एसआरए प्रकल्प रखडलेत. त्यांची बैठक आपण घेऊ. जो मुंबईकर बाहेरगावी राहायला गेलाय, बेघर झालाय अशा मुंबईकरांना मुंबईत परत आणायचे असेल तर एसआरए व रखडलेल्या प्रकल्पाना चालना देणे गरजेचे आहे. स्वयं पुनर्विकास हे मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल. अन्य बँकानी त्याचे अनुकरण केले पाहिजे. अभ्यूदय नगरचा पुनर्विकास करण्यासाठी जे-जे काही करावे लागेल ते सरकार म्हणून आम्ही करू, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासित केले.
 
मुंबईत जे एसआरए प्रकल्प आहेत. बाळासाहेबांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय महायुती सरकार राहणार नाही. निवडणुकी पुरता मराठी माणूस, मुंबईकर करून चालणार नाही, असा टोला त्यांनी उबाठा गटाला लगावला. तसेच मुंबई बँकेने जे काही पाऊल उचलले आहे ते वाखाणण्यासारखे आहे. सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जे काही लागेल ते दिले जाईल. 'सहकार से समृद्धी' हे ब्रीद वाक्य पुढे न्यायला हवे.
 
महाविकास आघाडी सरकार वेळी मुंबई बँकेवर चौकशी लावली. प्रविण दरेकर यांना अटक करण्याचे क्षडयंत्र रचले गेले. मला जेव्हा कळले तेव्हा मी स्पीड वाढवला आणि टांगा पलटी केला. मुंबई बँकेमार्फत तुम्ही ज्या काही मागण्या केल्यात त्याबाबत सरकार पॉझीटिव्ह निर्णय घेईल. अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासात ज्या अडचणी येतील त्या सरकार दूर करेल व मुंबईतील जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना चालना देण्याचा प्रयत्न सरकार, गृहनिर्माण विभाग करेल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले.
 
तर राज्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले कि, मुंबई बँकेमार्फत प्रविण दरेकर यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोणतीही बँक कर्ज देताना वयोमर्यादा पाहते. पण मुंबई बँकेच्या संचालकांनी ज्यांचे कोणी नाही त्यांनाही कर्जवाटप केले. महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा आज तुमच्यासमोर बोलतोय. हे सर्व सहकार चळवळीमुळे शक्य झालेय. हे वर्ष सरकारने सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे.
 
मुंबई बँकेने लाडक्या बहिणींचे झीरो बॅलन्स खाते उघडून घेतले. प्रविण दरेकर यांनी ज्या मागण्यांचे निवेदन दिले त्याबाबत लवकरच बैठक लावू, सहकार विभागामार्फत जे-जे काही लागेल ते देणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी आश्वासित केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळ वाढवू अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
तत्पूर्वी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले कि, मुंबई बँक ही राज्यातील आदर्श बँक आहे. अनेक सुविधा बँकेच्या माध्यमातून दिल्या जातात. काम करताना आम्ही सामाजिक बांधिलकी समजून करतो. लाडक्या बहिणींसाठी एकही रुपया न घेता जिल्हा बँकेत खाती उघडली आहेत. आता येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणीसाठी १० हजारापासून ते २५ हजारापर्यंत विनातारण व्यवसायासाठी कर्ज देणार असल्याचेही दरेकरांनी सांगितले. यावेळी दरेकर यांनी गिरणी कामगार, माथाडी कामगार यांना केलेल्या आर्थिक मदतीचा ही उल्लेख केला.
 
दरेकर पुढे म्हणाले कि, स्वयं पुनर्विकास योजना मुंबईत आणली. १६०० प्रस्ताव आमच्याकडे आलेत. छोट्या घरात राहणारा माणूस मोठ्या घरात राहायला गेलाय. ही योजना आपण ठाण्यातही राबवू शकतो. ठाणे मनपाला सोबत घेऊन स्वयं पुनर्विकास योजना राबवावी अशी विनंती ही दरेकरांनी केली. स्वयं पुनर्वीकासाबाबत काही निर्णय झालेत तर काही निर्णय होणे बाकी आहेत. बाकी असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्या, अशी विनंती दरेकरांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
 
तसेच सहकार विभागाशी अनेक विषय आहेत. मुंबईत वॉर्डात जशी पालिकेची कार्यालये आहेत. तशी सहकाराची कार्यालये व्हावीत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना आदेश द्यावेत, अशी मागणी दरेकरांनी केली. तसेच मुंबई बँक मध्यम वर्गीयांची आहे. ती सशक्त करण्याची गरज आहे. खासगी बँकांना ताकद देण्याची गरज नाही. जिल्हा बँकेला डिपॉझिट मोठ्या प्रमाणावर दिलात तर बँक सशक्त होईल, असेही दरेकर म्हणाले.
 
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर टिकास्त्र डागताना दरेकर म्हणाले कि, सावंत यांनी येथे काही दिवसांपूर्वी उपोषणाचे नाटक केले. अभ्यू दय नगर येथे लहानाचे मोठे झालेले खासदार तुम्ही कुणासोबत आहात ते आधी ठरवा, अशी धमकी दिली. फडणवीस, शिंदे विकास करताहेत म्हणून त्यांचा जळफळाट होतोय. लोकांना गुमराह करायचा प्रयत्न करू नका. रंग असून विठ्ठल होता येत नाही, असा टोलाही दरेकरांनी लगावला. तसेच दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातूनही ठाकरे गटाला टोला लागवला.
 
ते म्हणाले कि, आतापर्यंत मराठी माणूस भुलला तुमच्या सोंगा, बाळासाहेबांच्या विचारांना दाखवला तुम्ही ठेंगा! म्हणून शिंदेंनी पलटी केला तुमचा टांगा...सच्चाईसाठी लढायला शिंदेंकडे लागल्या रांगा! आता तुमच्याकडे कुणी राहिलेले नाही... याप्रसंगी आमदार प्रसाद लाड, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई बँकेचे संचालक नितीन बनकर यांनी केले.
 
Powered By Sangraha 9.0