ठाणे: ( Chhatrapati Shivaji Maharaj magnificent temple in Bhiwandi ) भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा गावात शिवभक्त राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून चार एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर व शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जाज्वल्य देखावा उभारण्यात आला आहे. “गडकिल्ल्यांच्या धर्तीवर दुसरे व महाराष्ट्रातील पहिले असलेल्या या शिव छत्रपती मंदिरांचे लोकार्पण सोमवार, दि. १७ मार्च रोजी तिथीनुसार होणार्या शिवजयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे,” अशी माहिती ‘शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांनी दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम व देदीप्यमान इतिहास संपूर्ण जगासमोर यावा. शक्तिपीठ रूपाने ठाणे जिल्ह्याची ओळख जगास व्हावी आणि ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळावी. या हेतूने भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे देशातील सर्व प्रांतातील विविध मंदिराच्या शैलींचा प्रभाव असलेले भव्य-दिव्य स्वरूपातील छत्रपती शिवराय मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराची रूपरेषा ह.भ.प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली बनवली असून, मंदिराची निर्मिती अभियंता व वास्तुविशारद विशाल विजयकुमार पाटील यांनी केली आहे.
या मंदिराचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या तिथीनुसार सोमवार, दि. १७ मार्च रोजी होणार आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वंशज छत्रपती खा. उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, कॅबिनेट मंत्री व ठाणे पालघर जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भिवंडीतील छत्रपतींच्या या पहिल्याच मंदिरांचा सोहळा शुक्रवार, दि. १४ मार्च रोजीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार शनिवार, दि. १५ मार्च रोजी आध्यात्मिक दिन, रविवार, दि. १६ मार्च रोजी सांस्कृतिक दिन व सोमवार, दि. १७ मार्च रोजी ऐतिहासिक दिन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे, अशी माहिती ‘शिवप्रतिष्ठान ट्रस्ट’चे अध्यक्ष राजू चौधरी यांनी दिली.