धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना झाली विषबाधा

12 Mar 2025 13:34:08
 
30 people were poisoned after eating panipuri in bhandara
 
 
भंडारा : (Bhandara)तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे दि. ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या २२ रुग्णांनी बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अन्य ७-८ जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. 
 
सुकळी येथे परमात्मा एक सेवक सम्मेलन कार्यक्रमात वितरित करण्यात आलेल्या अन्नातून व येथील विक्रेत्यांकडील पाणी पुरी खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये कविता डोळस (३४),अक्षय डोळस(१४), निहार बांडेबुचे (१४), श्रेयश ठवकर (५), रियांश ठवकर (८), कौशीक जगनाडे (१९), दिवेश शहारे (१९), भावेश राऊत (८), सुप्रिया नेरकर (१४), प्रिंयाशी राऊत (५), कांता राऊत ( ४५), मनिषा राऊत (४०), संकेत राऊत (८), रेखा राऊत (३२), प्रज्वल भुरे (१४) योगेश शहारे (२१) प्रतीक शहारे (१३), संजय शेंडे (३२), मंगेश शेंडे (२३), वर्षा डोळस (३७), श्रेया डोळस (१४) सतिश मुंडे (१४) सर्व रा.सुकळी व अन्य सात आठ जण रोहा, आंधळगाव, जांब, कांद्री येथील असल्याची माहिती आहे.
 
कार्यक्रम स्थळी सायंकाळी सेवकांना महाप्रसाद वितरीत करण्यात आले होते. तर काहींनी कार्यक्रम स्थळी असलेल्या पाणी पुरी विक्रेत्यांकडील पाणी पुरी खाल्ल्याने तब्बल तीस लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. परिणामी येथील महिला, पुरुष व लहान बालकांना उलटी, हगवण असे त्रास दुसऱ्या दिवशी सकाळी जाणवल्याने एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच सुकळी येथे बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. येथील रुग्णांची तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0