धारावीतील ११ प्रशिक्षित उमेदवार महानगर गॅस कंपनीत रुजू

11 Mar 2025 15:46:29

dharavi


मुंबई, दि.११ : विशेष प्रतिनिधी 
धारावीतील स्थानिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या 'धारावी सोशल मिशन' (डीएसएम) ने 'डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' (डीबीआयटीआय) च्या सहकार्याने धारावीतील युवकांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमात 'गॅस पाईपलाईन फिटर' चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या धारावीतील ११ उमेदवारांना थेट महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) मध्ये कायमची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये २ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

डीएसएमच्या पुढाकाराने डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान एकूण २१ प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांसह थेट इंडस्ट्रियल ट्रेनिंगची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींना ५००० रुपयांचे मासिक विद्यावेतन देण्यात आले, तर एमजीएलमध्ये रुजू झालेल्या यशस्वी उमेदवारांना १५००० मासिक वेतन देण्यात येणार आहे.

कष्टाळू वृत्ती आणि आपल्या अनोख्या टॅलेंटमुळे देशभरात ओळखल्या जाणाऱ्या धारावीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी डीएसएमच्या माध्यमातून नेहमीच नवनव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून एमजीएलमध्ये नोकरी मिळवलेल्या सोनाली रमेश हिने डीएसएमचे आभार मानले. "गॅस पाईपलाईन फिटिंगच्या क्षेत्रात काम करण्याचा कधी विचारही केला नव्हता. मात्र या अभ्यासक्रमाने मला वेगळा आत्मविश्वास दिला. त्यामुळेच मी ही नोकरी मिळवू शकले. या क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी देखील यायला हवे"अशा शब्दांत सोनालीने आपली प्रतिक्रिया दिली.

"या अभ्यासक्रमाने माझ्या जीवनाला सकारात्मक कलाटणी दिली. भविष्यात नेमकं काय करायचं? हा प्रश्न मला आणि माझ्या मित्रांना नेहमीच भेडसावत होता. पण आता आमच्याकडे कौशल्य आहे आणि हातात रोजगारदेखील आहे. याचे संपूर्ण श्रेय डीएसएमला देतो"अशा शब्दांत यशस्वी उमेदवार हानीफ असलम शेख याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
"धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून धारावीकरांसाठी नेहमीच नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. धारावीतील तरुण-तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा आमचा मानस आहे. धारावीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत"अशा शब्दांत डीएसएमच्या प्रवक्त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

धारावीतील तरुणांच्या कौशल्याचे कौतुक एमजीएलच्या वतीने करण्यात आले. "धारावीतील तरुण-तरुणी कष्टाळू आणि हुशार आहेत. आमच्या कंपनीत त्यांचे स्वागत आहे. मिळालेल्या संधीचे ते सोने करतील याची मला खात्री आहे. डीएसएमच्या सहकार्याने भविष्यात जास्तीत जास्त धारावीकरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू" अशी प्रतिक्रिया एमजीएलच्या प्रवक्त्यांनी दिली. रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून धारावीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी डीएसएमच्या वतीने नेहमीच पुढाकार घेण्यात येतो.
Powered By Sangraha 9.0