तानसात प्रथमच, तर महाराष्ट्रात चौथ्यांदाच सापडला हा दुर्मीळ शिकारी पक्षी; वनपालाने केली नोंद

11 Mar 2025 16:13:37
eurasian goshawk



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ठाणे जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यातून युरेशियन ससाणा (eurasian goshawk) या पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. शिवाय या दुर्मीळ शिकारी पक्ष्याची ही महाराष्ट्रातील चौथीच नोंद आहे. अभयारण्यातील वनपाल योगेश शिद यांना शनिवार दि. ८ मार्च रोजी या पक्ष्याचे दर्शन झाले. (eurasian goshawk)
 
 
तानसा म्हटले की पक्षीनिरीक्षकांची पाऊले ही संकटग्रस्त वनपिंगळा पक्ष्याला पाहण्यासाठी या अभयारण्याकडे वळतात. जंगलात अधिवास करणाऱ्या पक्ष्यांच्या समृद्ध विविधतेसाठी या अभयारण्याला ओळखले जाते. शिवाय तानसा जलाशय, मोडक सागर जलाशय तसेच काही पाझर तलाव आणि नद्यांच्या पात्रामुळे या अभयारण्यात पाणपक्ष्यांची विविधताही समृद्ध आहे. या अभयारण्यात पक्ष्यांच्या साधारण ३०० हून अधिक प्रजाती आढळतात. त्यामध्ये आता एका प्रजातीची भर पडली आहे. अभयरण्यातील वनपाल योगेश शिद हे शनिवारी नियमित गस्त करत असताना त्यांना पाणवठ्यावर एक शिकारी पक्षी दिसला. तो पाणी पित होता. शिद हे स्वत: उत्तम पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकार असल्याने त्यांनी लागलीच या पक्ष्याची छायाचित्र टिपली. तज्ज्ञांकडून या पक्ष्याची ओळख युरेशियन ससाणा, अशी करण्यात आली. या पक्ष्याची ही तानसामधील पहिलीच नोंद असून महाराष्ट्रातील चौथी नोंद असल्याची माहिती शिद यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
 
 
युरेशियन ससाण्यांना 'नाॅर्दन ससाणा' देखील म्हटले जाते. हे ससाणे प्रामुख्याने युरेशियामध्ये आढळतात. मात्र, यामधील काही उपप्रजाती या आशियामधील हिमालयीन प्रदेश आणि चीनमध्ये आढळतात. याशिवाय काही उपप्रजाती मोरोक्को, दक्षिण इटली, दक्षिण ग्रीस, तुर्की, उत्तर इराण, उत्तर कझाकस्तान, मंगोलिया याठिकाणी प्रजनन करतात. यामधील बहुसंख्य ससाणे हे स्थलांतर करत नाहीत. मात्र, त्यांची एक छोटी संख्या ही हिवाळ्यात आग्नेय आशियाच्या दिशेने स्थलांतर करते. मध्य किंवा दक्षिण भारतात ते भरकटलेल्या अवस्थेत येतात. युरेशियन ससाणे ही प्रामुख्याने जंगलात अधिवास करतात. प्रजनन काळात ते आपल्या घरट्याच्या संरक्षणासाठी आक्रमक असतात. ससा किंवा ग्राऊस असे मोठे पक्षी आणि प्राण्यांची शिकार करतात. त्याचे पंख मोठे आणि रुंद असतात. डोळे हे केशरी रंगाचे आणि त्यावर ठळक पांढऱ्या रंगाची भुवई असते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0