नाशिक: ( Patotsav festival celebrated at Shri Kalaram Temple ) नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात सोमवार, दि. १० मार्च रोजी पाटोत्सवाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. आमलकी एकादशीच्या मुहूर्तावर काळाराम मंदिरात रामरायाला ३२ हात पांढरेशुभ्र वस्त्र प्रदान करण्यात आले. तसेच रामरायासह लक्ष्मणाला परंपरेनुसार तब्बल ३२ हात लांब फेटा बांधण्यात आला. गेल्या २७ पिढ्यांपासून पुजारी घराण्यातील ही परंपरा असून अनेक शतके या परंपरेचे पालन केले जात आहे.
फेटा नेसवायच्या आधी रामरायाला १६ पुरुषसुक्ताद्वारे महापूजा संपन्न केली गेल्यावर विधीपूर्वक प्रथम श्वेतवस्त्र झगा पोशाख, सीतादेवींना साडी चोळी नेसवून मग श्रीरामांना फेटा बांधायला सुरुवात करण्यात आली. श्वेतवस्त्रातील रामरायाचे दर्शन मोठे पुण्यकारक सांगितले आहे.
एरवी ११ महिन्याला सर्व एकादशीला पितांबर नेसवलेले असते. फक्त हा फाल्गुन मास हे पांढरे वस्त्र उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून नेसवले जाते. श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी महापूजा महाअभिषेक आरती संपन्न केली. सचिन पुजारी, दिपक कुलकर्णी यांनी हा फेटे विधी संपन्न केला. देवेंद्र पुजारी, धनंजय पुजारी, प्रदिप वाघमारे यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर रहाड उत्सवाला सुरुवात
रंगपंचमीच्या दिवशी केशर व पळसाच्या फुलांचा रंग उकळून त्याचा रंग तयार केला जातो. वासंतिक नवरात्र उत्सवात मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते ‘श्रीं’ना श्रीखंडाचा नैवेद्य दिला जातो. यावेळी श्वेत वस्त्रावर रंग व गुलाल टाकल्यावर नाशिककरांच्या रंगपंचमी रहाड उत्सवाला सुरूवात होते.
पाटोत्सव म्हणजे काय?
श्री काळाराम मंदिर हे ऐतिहासिक असून काळ्या दगडात बांधलेले आहे. देवकलाहास निवृत्तीपूर्वक देवकला अभिवृद्धीसाठी देवतांच्या मस्तकावर पट्टबन्ध बांधणे म्हणजे ‘पाटोत्सव’ असे ‘प्रतिष्ठामहोददी’ व ‘प्रतिष्ठामौक्तिकम्‘ या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. दरम्यान, ३२ ही संख्या अनुष्टुप छंदाचे रूप आहे. वेदातील पुरुषसुक्त, रामरक्षा, पवमानसुक्तांतील बहुतांशी ऋचा याच छंदात आल्या आहे. चारही वेदातील स्तुती मंत्र अनुष्टुपछंदात आहे. या छंदातील स्तुतीने प्राणरूपी देवता प्रसन्न होतात, म्हणून देवतांनादेखील या छंदातील स्तुती आवडते.