मुंबई (अक्षय मांडवकर) - ओडिशाच्या किनार्यावरील अंडी घालतेवेळी टॅग केलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवाने गुहागराच्या किनार्यावर येऊन अंडी घातल्याची नोंद वनविभागाच्या कांदळवन कक्षाने केली आहे (tagged sea turtle lay eggs). या कासवाला लावलेल्या ’फ्लिपर टॅग’मुळे ही माहिती समोर आली आहे (tagged sea turtle lay eggs). महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अंडी घालणारे मादी कासव देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आल्याची ही इतिहासातील पहिलीच नोंद आहे. (tagged sea turtle lay eggs)
बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रात अधिवास करणार्या ’ऑलिव्ह रिडले’ कासवांचे पॉप्युलेशन हे वेगवेगळे असल्याचे मानले जात होते. मात्र, भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणार्या मादी कासवांना ’सॅटेलाईट टॅग’ लावले आणि पहिले कोडे उलगडले. ओडिशात सॅटेलाईट टॅग लावलेल्या कासवाच्या माद्या या पश्चिम सागरी परिक्षेत्रातील लक्षद्वीपपर्यंत पोहोचल्याचे आढळले. तर गुहागरच्या किनार्यावर ’सॅटेलाईट टॅग’ केलेल्या मादी कासवाने पूर्व सागरी परिक्षेत्रापर्यंत प्रवास केला. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये या माद्या प्रवास करून पोहोचलेल्या ठिकाणी अंडी घालतात का, यासंबंधीचा पुरावा संशोधकांच्या हाती लागला नव्हता. मात्र, आता ते कोडेदेखील उलगडले आहे. कारण, २०२१ साली ओडिशात अंडी घातलेल्या मादीने जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनार्यावर येऊन अंडी घातल्याची माहिती कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
दि. २७ जानेवारी रोजी गुहागर येथील बाजारपेठ भागातील भोसले गल्लीजवळ रात्री सुमारे ८.४० वाजेच्या दरम्यान एक मादी कासव अंडी घालण्यास आली. ही मादी अंडी घालून समुद्रात परत जाण्यासाठी निघाली, तेव्हा बीच मॅनेजर शार्दुल तोडणकर आणि संजय भोसले यांना तिच्या पुढच्या परांना लावलेला फ्लिपर टॅग दिसला. कासवाच्या एका परावर 03233 क्रमांक आणि दुसर्या परावर 03234 क्रमांकाचा टॅग होता. तसेच, मागच्या बाजूला ’झेडएसआय’ म्हणजेच ’झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ असे नाव कोरलेले होते. ही सर्व माहिती कांदळवन कक्षाकडून ’भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. सुरेश कुमार यांना पाठविण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मादी ओडिशा राज्यातील गहिरामाथा येथील व्हीलर आयलंडच्या किनार्यावर दि. १८ मार्च, २०२१ रोजी अंडी घालण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला ’झेडएसआय’च्या शास्त्रज्ञांनी फ्लिपर टॅग लावले. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी या मादीने महाराष्ट्रातील गुहागरच्या किनार्यावर येऊन अंडी घातली.
याचा अर्थ काय?
या नोंदीमुळे ओडिशाच्या किनार्यावर अंडी घालणारी मादी कासव महाराष्ट्राच्या किनार्यावर येऊनही अंडी घालत असल्याचे प्रामुख्याने समजल्याचे कांदळवन प्रतिष्ठानचे साहाय्यक संचालक (संशोधन) डॉ. मानस मांजरेकर यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले की, “ही संख्या कमी असण्याचीदेखील शक्यता आहे. कारण, ओडिशामध्ये मोठ्या संख्येने सागरी कासवांना फ्लिपर टॅग लावण्यात आले आहेत. असे असूनही आपल्याला मिळालेली ही पहिलीच नोंद आहे. त्यामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनार्यांवर अंडी घालत असणार्या कासवांची संख्या खूप कमी असू शकते.”