नवी दिल्ली: ( amit shah ) दिल्लीत बेकायदा राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या मुसक्या आवळा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनास दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद दिल्लीचे पोलीस आयुक्त कायदा-सुव्यवस्था आणि समन्वय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशात प्रवेश करण्यास, त्यांची कागदपत्रे बनवण्यास आणि येथे त्यांचा मुक्काम सुलभ करण्यास मदत करणार्या संपूर्ण नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. “बेकायदेशीर घुसखोरांचा प्रश्न हा राष्ट्रीय सुरक्षेशीदेखील संबंधित आहे आणि त्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना ओळखून तेथून हद्दपार केले पाहिजे,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
“दिल्लीतील आंतरराज्यीय टोळ्यांना कठोरपणे संपवणे ही दिल्ली पोलिसांची प्राथमिकता असावी,” असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन जनसुनावणी शिबिरे आयोजित करावीत आणि जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. दिल्ली पोलिसांनी दररोज वाहतुककोंडी असलेल्या ठिकाणांची ओळख पटवावी आणि दिल्ली पोलीस आयुक्त आणि मुख्य सचिवांनी भेटून यावर त्वरित तोडगा काढावा, जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे, दिल्ली सरकारने पाणी साचणार्या ठिकाणांची ओळख पटवून पाणी साचण्याच्या समस्येवर ‘मान्सून कृती आराखडा’ तयार करावा,” असेही निर्देश शाह यांनी दिल्ली सरकारला दिले आहेत.