सतर्क राहा सुरक्षित राहा

    01-Mar-2025   
Total Views |
 
 पुणे स्वारगेट बलात्कार
 
पुणे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कारकांडाने अनेक प्रश्न उपस्थित झाले. हीच घटना नव्हे, तर अनेक घटनांमध्ये नीच, नराधमी बलात्कार्‍यांनी मुली-महिलांच्या विश्वासाचा, भोळेपणाचा, अज्ञानाचा मुख्यत: असाहाय्यतेचा गैरफायदा घेतला आहे. यासंदर्भात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या महिलांचे मत जाणून घेतले. त्यातून जाणवते की, त्यांनी सांगितलेल्या सूचना, विचार यांचा महिलांनी दैनंदिन जीवनात उपयोग केला, तर अशा घटनांना थोडा तरी आळा बसू शकतो. ‘महिला सुरक्षा’ हा विषय एकट्या महिलेचा, तिच्या कुटुंबाचा नसून, समस्त समाजाचा आहे. तसेच, समाज काय करायचे ते करेलच; पण महिलांनी स्वत:ची काळजी स्वत: घेण्यास सर्वार्थाने सक्षम व्हावे. सतर्क राहा, सुरक्षित राहा.
 
कुटुंब संस्थेने संस्कृती, संस्कार मूल्ये रुजवावी
 
विपरीत घटना घडत असताना महत्त्वाचे आहे प्रतिकार, सुटकेसंदर्भातील त्वरित निर्णय आणि त्यानुसार त्वरित कृती. अशा घटना घडल्यास काय करू शकतो, याची मानसिक तयारी कायम असावी. जसे, 1) अत्याचार्‍याला दोन लाथा घालण्याचे, प्रतिकार करण्याचे मानसिक बळ आत्मसात करायलाच हवे. 2) बहुतेकदा घाबरून पीडितेच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीत. यासाठी स्वनियंत्रण मिळवण्यासाठी रोजचा सराव. 3) प्रवासाचेे सुरक्षित नियोजन आणि त्यासंदर्भात घरातल्यांना कल्पना देणे. 4) आपली कृती-वर्तन आपल्या सुरक्षेसाठी योग्य आहेत का, याचा विचार करा. पालकांनी पाल्यांच्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याची काळजी घ्यावी. या स्वैराचारातूनच पुढचे सगळे अनर्थ घडत आहेत. सर्व मानवतेसाठी कुटुंब हे महत्त्वाचे आहे. संस्काराचे प्रशिक्षण या व्यवस्थेतून व्यक्तीला मिळायलाच हवे.
 
-कल्पना क्षिरसागर, पिंपरी-चिंचवड
पश्चिम महाराष्ट्र प्रांत मातृशक्ती आयाम प्रमुख, कुटुंब प्रबोधन
 
 
 
प्रशासनसोबत मात्र, नेहमी सतर्क असावे
 
सर्वप्रथम अनोळखी स्थळी जाताना त्याबद्दल सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. प्रवासात अनोळखी व्यक्तींशी संवाद वाढवू नये. त्याने किंवा तिने काहीही खायला, प्यायला दिले, तर ते घेऊ नये. एखाद्या ठिकाणी असुरक्षित वाटत असेल, तर कृपया महिलेने त्वरित 103 क्रमांक डायल करावा. ‘निर्भया पथक टीम’ त्यास्थळी मदतीसाठी काही क्षणातच पोहोचते. 100 नंबर किंवा 112 हा नंबरसुद्धा तुम्ही वापर करू शकता. जर हे करू शकला नाहीत, तर ओरडून लोकांचे लक्ष वेधा. अनोळखी ठिकाणी प्रवासासाठी ज्या खासगी वाहनामध्ये बसता, त्या वाहनाची नेमप्लेट नंबर तुमच्या घरी कळवा. रेल्वे प्रवास करताना महिला कोच रिकामा असेल, तर तीथे पोलीस गार्ड असेल, तरच त्या डब्ब्यातून प्रवास करा. अन्यथा एकट्याने लेडीज डब्याचा वापर करू नये. प्रशासन समाज महिला सुरक्षिततेसाठी नेहमीच प्राथमिकता देते.
 
पद्मावती, मुंबई पोलीस
 
स्वसंरक्षण प्रशिक्षण गरजेचे
स्वसुरक्षा प्रशिक्षक आणि वकील म्हणून मी खात्रीने सांगते की, स्वसुरक्षा प्रशिक्षण घेतलेली मुलगी, महिला साध्या रूमाल, ओढणीचा वापर करून किंवा पर्सच्या फटक्याचा वापर करूनही गुन्हेगारावर हल्ला करू शकते. मात्र, विपरीत घटनांमध्ये आपला बचाव कसा होईल, याबाबतच्या तर्कशुद्ध मानसिकतेचे प्रशिक्षणही मुलींसाठी आवश्यक आहे. आधुनिक जगात महिलांची कार्यक्षेत्रे विस्तारली आहेत. त्यामुळे एकटीने रात्री अपरात्रीही अनोळखी ठिकाणी तिला प्रवास करावा लागतो. त्यामुळे महिलांनी नेहमीच सतर्क राहिले पाहिजे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना हजारवेळा विचार करायला हवा. वास्तवतेबाबतची समज असणेही गरजेचे आहे. त्यासाठी जगात काय चालले आहे, याबद्दल जागरूकता आवश्यक आहे. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी महिलांसोबत पुरुषांचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे. समाजातही विकृती का वाढली आहे, याचा शोध घेऊन त्यावर कारवाई होणे गरजेचे.
 
- अ‍ॅड. प्रियंका राणे, महिला स्वसुरक्षा प्रशिक्षक, मुंबई
 
महिला सुरक्षिततेला प्राधान्य
आता शाळांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे आणि घराबाहेरच्या जगात कोणती सावधानता बाळगायला हवी, याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. महिलांनी प्रवासात घरातल्या व्यक्तींच्या संपर्कात असायला हवे. महिला सुरक्षिततेसाठी हेल्पलाईनचा उपयोग कसा, कधी करायचा, याचे बाळकडू प्रत्येक मुलींना द्यायला हवे. हे सांगण्याचा उद्देश यासाठीच की, आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. कमी वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करणे, तसेच सीसीटिव्ही बसवणे, हेसुद्धा गरजचे आहे. तसेच, गुन्हेगारांना त्वरित आणि कठोरातले कठोर शासन होणे गरजेचे आहे. फाशी किंवा जन्मठेप शिक्षाही कमीच आहे. महिला सुरक्षिततेकडे प्रत्येक व्यक्तीने आपले प्रथम कर्तव्य आहे, असे समजून कृती करण्याची आज गरज आहे.
 
-आदिती बारई शाखाधिकारी, जनकल्याण सहकारी बँक लि. मुलुंड
गुन्हेगाराला कठोर शासन गरजेचे
स्त्रियांसोबत गैरवर्तन, दुष्कृत्य करणार्‍या माणसांचे डोळे काढणे, हातपाय तोडणे, तोफेच्या तोंडी देणे अशा कठोर शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज करायचे. त्यामुळे अशी दुष्कृत्ये करण्याची कुणाचीही हिंमत महाराजांच्या काळात होत नसे. आज अशाच कठोर दंडाची आपल्या कायद्यामध्ये आवश्यकता आहे. देशप्रेमी व्यक्ती वाईट काम करायला धजावत नाही, हा अनुभव आहे. मुलांमध्ये लहानपणापासूनच आध्यात्मिकता आणि देशभक्तीही रुजवायला हवी. पाल्यामध्ये वाईट गुण आढळले, तर हे दुर्गुण कसे नष्ट करता येतील, यासाठी पालकांनी कार्यवाही करावी. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे लहानपणापासूनच द्यायला हवेत. कुटुंबातील व्यक्तींनी जर कुटुंबातील स्त्रीला मान दिला, तर लहान मुलं त्याचे अनुकरण करतील. तेही महिलांचा आदर करतील.
भारती रूळे
 
मुख्याध्यापिका इंग्लिश स्कूल, ऐरोली, नवी मुंबई
 
 
 
 
महिला सुरक्षा-सामाजिक कर्तव्य
 
केवळ कायदे कठोर करून किंवा पोलीस बंदोबस्त वाढवून, या घटनांना आळा घालता येणार नाही. तर महिलांनी स्वसुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. निर्जन, अंधार्‍या आणि संशयास्पद ठिकाणी जाणे टाळावे. गरज असल्यास गटाने प्रवास करावा. सार्वजनिक वाहतूक वापरताना सावधगिरी बाळगावी आणि अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. पालकांनी मुलींना लहानपणापासूनच सुरक्षिततेच्या सवयी लावाव्या. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन करणार्‍या व्यक्तींना रोखणेही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महिलांची सुरक्षितताही कायद्यापुरती मर्यादित न ठेवता, ती सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे. महिलांनी सावध राहिले पाहिजे. पालकांनी योग्य मार्गदर्शन केले पाहिजे आणि समाजाने सजग राहून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे.
 
-गौरी पिंगळे, उद्योजिका सामाजिक कार्यकर्ता, पुणे
 
 
शारीरिकसह मानसिक बळ आवश्यक
 
अनेक महिलांना हतबलता वाटते की, गुन्हेगाराला त्या प्रतिकार करू शकणार नाही? त्यांना वाटते त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती नाही.त्यांच्याकडे तितके शारीरिक बळ नाही. त्यामुळे शारीरिक शक्तीही महिलांसाठी आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कसे बलवान होऊ, यासंदर्भात महिलांनी नियोजन करायला हवे. गुन्हेगाराला प्रतिकार करताना काय करणे आवश्यक आहे, याचे ज्ञान महिलांनी आत्मसात करावे. मात्र, यासाठीही महिलांची मनस्थिती स्थिर असायला हवी. अस्थिर, नैराश्याच्या मानसिकतेतून महिलांना वेळेवर काय करावे, हे सुचत नाही. शरीर स्थितीसोबतच मानसिक सुदृढता मिळवण्यासाठी महिलांनी अग्रेसर असावे. मनशांती मिळवून मन स्थिर ठेवण्यासाठी योगा आणि व्यायामासाठी वेळ द्यावा. मन स्थिर आणि शारीरिक बळ असले की, महिला कोणत्याही घटनेत स्वत:चा बचाव करू शकते.
 
- डॉ. रूपाली जोशी, ठाणे
 
शस्त्र, शास्त्राचे ज्ञान मिळवणे आवश्यक
आधुनिकतेच्या, स्वातंत्राच्या नावाखाली जीवनमूल्ये हरवत चालली आहेत. बलात्काराला पोषक वातावरण तयार झालेले आहे का? समाजातले वातावरण बदलण्याची गरज आहे. सर्वात आधी महत्त्वाचे आहे ते म्हणजे, बलात्कारामागची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे. हे केवळ संस्कारानेच होऊ शकते. आपली संस्कृती, आपली धर्म नीतिमत्ता प्रत्येक मातापित्यांनी आपल्या पाल्यांना शिकवायलाच हवे. तसेच, प्रत्येक मुलीला शस्त्र आणि शास्त्र शिकवणे अनिवार्य आहे. स्त्रियांवरील अत्याचार थांबवायचे असतील, तर प्रत्येक मुली-स्त्रियांना शस्त्र, शास्त्राची जोड देणे, ज्ञान प्राप्त करवून देणे, आवश्यक असून हे खर्‍या अर्थाने, सर्वार्थाने महिला सक्षमीकरण असेल. तसेच, निर्भयपणे वावरता येण्यासाठी वातावरणदेखील निर्माण होईल.
 
- काव्या अंभिरे, नवी मुंबई
सहसंयोजिका, विश्वमांगल्य सभा
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.