मध्य प्रदेशातील जगप्रसिद्ध खजुराहो मंदिराप्रमाणेच एक मंदिर छत्तीसगढमध्येही आहे. या मंदिरावर असणार्या वेगवेगळ्या कामशिल्पांमुळे याला ‘छत्तीसगढचे खजुराहो’ असे नाव पडले असावे. असे हे मंदिर म्हणजे फणीवंशीय राजांनी उभारलेले ‘भोरमदेव मंदिर.’ अशा या फारशा परिचित नसलेल्या ‘भोरमदेव मंदिरा’ची ‘जिज्ञासा’ उलगडणारा हा लेख...
मध्य प्रदेशपासून 2000 साली वेगळा झालेला आणि या भागांमध्ये असणार्या 36 वेगवेगळ्या किल्ल्यांमुळे नाव मिळालेला प्रदेश म्हणजेच, आपला छत्तीसगढ! हा प्रदेश जरी आता वेगळा झाला असला, तरी याचे स्वतःचे अस्तित्व अगदी रामायण, महाभारत कालखंडापासून आपल्याला बघायला मिळते. प्रभू श्रीरामाची आई, माता कौशल्याही याच प्राचीन कौसल प्रांतातील. छत्तीसगढवर ‘हैहेय’ किंवा ‘छेदी’ राजवंशापासून ते नागपूरच्या भोसल्यांपर्यंत अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि ताकदवान राजसत्तांनी राज्य केले. या प्रांताच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत खूप मोलाचे योगदान या सर्व राजसत्तांनी दिले आहे.
फणीवंशीय राजे हे अशाच एका महत्त्वाच्या राजसत्तांपैकी एक. या राजांची माहिती मडवामहल नावाच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखामध्ये वाचायला मिळते. यांच्या कार्यकाळात अनेक वेगवेगळ्या मंदिरांची निर्मिती केली गेली. यापैकीच ‘छत्तीसगढचे खजुराहो’ म्हणून ओळखले जाणारे सुंदर मंदिर म्हणजे भोरमदेव मंदिर.
या भोरमदेव मंदिराच्या नावापाठीमागे अनेक कथा दडलेल्या आहेत. स्थानिक मतानुसार, भोरमदेव नावाच्या राजाच्या नावानेच हे मंदिर ओळखले जाते. पण, अशा कुठल्या राजाचे लेखी पुरावे आज तरी उपलब्ध नाहीत. तिथल्या स्थानिक गौंड भाषेमध्ये ‘भोरमदेव’ याचा अर्थ ‘शिव’ असा होतो. त्यावरूनच या मंदिराला ‘भोरमदेव मंदिर’ असे म्हटले जात असावे. स्थानिक गुराखी लोकांमध्ये आजही या मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
लक्ष्मणराय आणि गोपालदेवराय या फणीवंशीय राजांनी इसवी सनाच्या नवव्या - दहाव्या शतकात या मंदिराची रचना केली. सुदैवाने परकीय आक्रमणापासून हे मंदिर काही प्रमाणात वाचल्यामुळे इथली शिल्पे आणि मंदिराचे स्थापत्य हे जसे होते, तसे राहिले आहे. कमी प्रमाणात भग्न झालेलीही शिल्प आपल्याला एक वेगळी अनुभूती देऊन जातात. आपण आधी मंदिराचे स्थापत्य समजून घेऊन, उत्तरार्धात तिथली काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्पेदेखील बघूया.
पूर्व-पश्चिम अशी मंदिराची रचना असून पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तिन्ही दिशांना मंदिरात येण्यासाठी प्रवेशद्वारे आहेत, यांना ‘अर्धमंडप’ असे म्हणतात. तिथून आपण मंडपामध्ये प्रवेश करतो. आपण कमावलेली कला देवाला अर्पण करण्यासाठी, एकत्रित पूजाअर्चा करण्यासाठी, थोडा वेळ शांत बसण्यासाठी या मंडपाचा वापर केला जातो. मंडप आणि गर्भगृह यांना जोडणार्या भागास ‘अंतराळ’ असे म्हणतात. काही पायर्या उतरून गर्भगृहामध्ये असणार्या शंकराच्या पिंडीचे दर्शन आपण घेतो. आपल्या हिंदू मंदिरांमध्ये बाहेरून आत येताना अशा पद्धतीची स्थापत्य रचना दिसते. या मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आणि त्याच्या द्वार शाखा या खूप सुंदर आहेत. विष्णुचे वेगवेगळे अवतार यावर कोरलेले आपल्याला दिसतात. मंदिराचे आतले स्तंभदेखील उत्तम नक्षीकाम युक्त असून, मंदिर पेलून धरणार्या भारवाहक यक्षांची रचना यावर केलेली आहे. मंदिराचे ‘वितान’ म्हणजेच, छताचा भागदेखील उत्कृष्ट स्थापत्य आणि नक्षीकाम यांचे उत्तम उदाहरण आहे.
भोरमदेव मंदिराला प्रदक्षिणा घालताना पायापासून शिखरापर्यंत वेगवेगळे भाग दिसतात. सर्वात खाली असतो तो म्हणजे मंदिराचा पाया, ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात. भोरमदेव मंदिराच्या अधिष्ठानात स्थापतींनी उत्तम गजथराची (एका रेषेत संपूर्ण मंदिराच्या भोवतीने त्या थरावर हत्ती कोरलेले असतात) रचना केलेली आहे. मंदिराची जी बाह्यभिंत आहे, त्याला ‘मंडोवर’ म्हणतात. मंडोवरावरती वेगवेगळ्या शिल्पांची रचना केलेली असते. मंडोवराच्या वरती मंदिराच्या शिखराचा भाग दिसतो. भोरमदेव मंदिराचे शिखर हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, छोटी छोटी शिखरे एकत्र करून एक अखंड शिखर तयार केलेले आहे. शिखराच्या सर्वात वरच्या भागात जो मोठा गोलाकार दगड दिसतो, त्याला ‘अमलक’ असे म्हणतात.
मंदिराच्या बाह्यांगावर अनेक उत्तमोत्तम शिल्पांची रचना केलेली आहे. पाशुपत सांप्रदायाचा पुरस्कर्ता लकुलीश, गजासुराचा संहार करणारा शिव, श्रीरामाचा परमभक्त हनुमान, उग्र शिवाचे रूप भैरव, सप्तमातृकांपैकी एक ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी, वामन आणि नरसिंह हे विष्णुचे अवतार, हातामध्ये दोन पद्म आणि पायात बूट असलेला सूर्य, नृत्यगणेश, शिव आणि विष्णु यांचे एकत्रित रूप हरिहर, चामुंडा, सृष्टीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असलेले पुरुष आणि प्रकृती म्हणजेच, शिव आणि पार्वती यांचे एकत्रित अर्धनारीश्वर रूप, महिषासुराचा वध करणारी दुर्गा एवढेच नव्हे, तर शब्द, रस, रूप, स्पर्श आणि गंध या पाच विकारांपासून सांभाळून राहा, असा अत्यंत सूचक संदेश देणार्या सुरसुंदरीदेखील इथे आहेत. या मंदिरावर असणार्या वेगवेगळ्या कामशिल्पांमुळे याला कदाचित ‘छत्तीसगढचे खजुराहो’ असे नाव पडले असावे. इथे आठ दिशांचे आठ देवदेखील कोरलेले आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर यांचे अनुक्रमे इंद्र, वरुण, यम आणि कुबेर असे देव असतात. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या उपदिशांचे अनुक्रमे अग्नि, निऋती, वायु आणि ईशान अशा देवता असतात. भोरमदेव मंदिरावरच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांचा परिचय थोडा विस्तृत करून घेऊया.
साधना, उपासना यांचे मार्ग जरी वेगळे असले, तरी उद्देश हा एकच आहे. आपण सगळे त्या परमात्म्याचे उपासक आहोत आणि सत्याच्या शोधात आहोत, हे सांगणारे शैव आणि वैष्णव या दोन प्रमुख संप्रदायांना एकत्र आणणारे, शिल्प म्हणजेच हरिहर. इथे असणारे शिल्प जर आपण वाचले, तर आपल्याला दिसेल की, या मूर्तीच्या हातात अक्षमाला, त्रिशूल, गदा आणि चक्र अशी चार आयुधे आहेत. यापैकी अक्षमाला आणि त्रिशूलही शंकराशी निगडित असून, गदा आणि चक्रही विष्णुशी निगडित आयुधे आहेत. शिल्पाच्या उजव्या कोपर्यात हात जोडून बसलेला मनुष्यरूपी गरुडदेखील आपल्याला दिसतो. सामाजिक एकी दाखवणारे हे एक महत्त्वाचे शिल्प आहे.
या मंदिरावर एक चामुंडेचे शिल्प आहे. कलाकाराने आपल्या पूर्ण क्षमतेने त्या काळ्या पाषाणात साक्षात मृत्यूसमोर कोरलेला दिसतो. 16 हातांची, चंड आणि मुंड नावाच्या असुरांचा संहार करणारीही चामुंडा आहे. देवीचा एक पाय भग्न असून, खपाटीला गेलेल्या पोटावरती विंचू कोरलेला दिसतो. डोक्यावरती किरिट मुकुट असून, हातामध्ये खड्ग किंवा तलवार, पात्र, नरमुंड, वज्र, धनुष्यबाण, अक्षमाला, अंकुश, इत्यादी आयुधे आहेत. गळ्यामध्ये नरमुंडांची माळ तिने परिधान केलेली आहे. या चामुंडेच्या चेहर्यावरचे खोल गेलेले डोळे आणि विकट हास्य हे आपल्याला स्तब्ध करून ठेवते.
पर्यटनदृष्ट्या तशा दुर्लक्षित असलेल्या या भागाकडे अगदी प्राचीन काळात माणूस राहत असलेल्या गुहांपासून ते भारतातल्या नायगारा समजल्या जाणार्या चित्रकोटच्या धबधब्यापर्यंत भरपूर काही पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. घनदाट जंगल, उत्तम मंदिरे, प्रामाणिक आणि माणुसकी जपणारे अनेक आदिवासी समूह, मनापासून आदरातिथ्य करणारे व्यावसायिक, हे सगळे बघायला जाण्यासाठी अगदी कानाकोपर्यापर्यंत केलेले चकचकीत आणि खड्डे नसलेले रस्तेही सर्वात महत्त्वाची गोष्ट. तिथली खाद्यसंस्कृती समजावी आणि उत्तम पाककृती खाता याव्यात, म्हणून गढ कलेवासारख्या छोट्या छोट्या उपहारगृहांची रचना तिथे केलेली आहे. तसेच, तिथली कलाकुसर, धातू आणि टेराकोटा यांच्यापासून बनवलेल्या वस्तू, या सर्वांसाठी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून वेगवेगळ्या गावांमध्ये झिटकू - मिटकी या केंद्रांची केलेली रचनादेखील आपल्याला दिसते. प्रत्येकाने एकदा तरी जाऊन अनुभवावे असे हे सुंदर राज्य आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यानंतर तिथला निसर्ग एक वेगळेच आकर्षक रूप धारण करतो, ते बघायला आणि अनुभवायला नक्की जाऊया. मग कधी करताय तयारी सुरू?
इंद्रनील बंकापुरे
7841934774
indraneel@virasatindia.in