नाशिक, दि.८ : प्रतिनिधी म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही ४९३ घरे २० टक्के सर्वसमावेश योजनेतील असून या घरांच्या सोडतीची साठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली. इच्छुकांना या घरांसाठी ७ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहेत. दरम्यान मंडळाने सोडतीचे वेळापत्रक जाहीर करून अर्जविक्री-स्वीकृती सुरू केली आहे. लवकरच सोडतीची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती म्हाडाने दिली आहे.
नाशिक मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते दुपारी २.३० वाजता अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता २० टक्के योजनेतील या घरांसाठी इच्छुकांना अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची मुदत ६ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. तर संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ मार्च रोजी दुपारी ४ पर्यंत आहे. ७ मार्च रोजी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येईल आणि १८ मार्च रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र नाशिक मंडळाने अद्याप सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्जदारांना सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.