राहुल गांधी यांचा पुन्हा थयथयाट

08 Feb 2025 12:01:29

Rahul Gandhi
 
नवी दिल्ली : (Rahul Gandhi) इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र अर्थात ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फसल्यानंतर आता मतदारयादीत घोळ असल्याचा नवा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
 
त्यांच्या या थयथयाटाला उबाठाचे खा. संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, उबाठाचे खा. संजय राऊत आणि राष्ट्रवाद काँग्रेस-शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेस लक्ष्य केले.
 
यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारयादीच बोगस असल्याचा दावा केला. “महाराष्ट्रात आमची (काँग्रेस आघाडी) मते कमी झालेली नाहीत. उलट, भाजपची मते वाढली आहेत. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात 32 लाख मतदार जोडले गेले. परंतु, 2024च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 39 लाख मतदार जोडले गेले आहेत,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
 
राहुल गांधी पुढे म्हणाले, “पाच महिन्यांत महाराष्ट्रात जितके मतदार जोडले गेले आहेत, तितकेच हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात वाढलेल्या मतदारांच्या संख्येइतके आहेत. महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या राज्याच्या लोकसंख्येपेक्षा कशी जास्त झाली हा प्रश्न आहे. मतदारयादीतून दलित आणि अल्पसंख्याकांची नावे वगळण्यात आली आहेत,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. “निवडणूक आयोग आमच्या तक्रारींना उत्तर देत नाही,” असेही त्यांनी म्हटले.
 
दरम्यान वाढीव मतदार आता बिहार आणि उ प्रदेशातही जातील असा दावा उबाठा खा. संजय राउत यांनी केला. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी अनेक खासदार आता मतपञिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत असा दावा केला. 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0