निसर्ग व संस्कृती संपन्न ओडिशा (उत्कल) राज्यातील महाकवी बलरामदास यांनी पुरीच्या मंदिरात, भगवान जगन्नाथासमोर बसून लिहिलेले रामायण म्हणजे ‘जगमोहन रामायण.’ या रामायणाला ‘दंडी रामायण’ म्हणूनही ओळखले जाते. हे रामायण उडिया भाषेतील आदि महाकाव्य असून, ते गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ आधीच्या काळातील आहे. स्वतःला ‘मत्त कृपासिद्ध बलराम’ म्हणवून घेणारा हा कवी उडियाचा ‘राष्ट्रकवी’ आहे. हे रामायण 1 लाख, 90 हजार ओव्यां(दंडी)चे आहे. त्याविषयी...
सम्राट अशोकचा एकेकाळचा ‘कलिंग’ देश म्हणजे आजचे ओडिशा राज्य. ‘उत्कल’ अशा नावाने या प्रदेशाचा आपल्या राष्ट्रगीतात उल्लेख आहे. भारताला लाभलेल्या समुद्रकिनारी राज्यांपैकी एक संस्कृती संपन्न राज्य. आपल्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गृहराज्य. जगन्नाथ रथयात्रेमुळे जगप्रसिद्ध अशा ओडिशाला वैभवशाली भक्तिपरंपरा लाभलेली आहे. सनातन हिंदूंच्या चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक, श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी ही ओडिशाची प्राचीन ओळख आहे. त्याशिवाय जगभरातील कलाप्रेमी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले ‘कोणार्क सूर्य मंदिर’ ओडिशाचा कलागौरव. अशा ओडिशा उर्फ उत्कल उर्फ उडिया प्रदेशात 15व्या शतकात ‘जगमोहन रामायण’ लिहिले गेले. या रामायणाला ‘दंडी रामायण’ म्हणूनही अनेकजण ओळखतात. उत्तर भारतात जसे ‘तुलसी रामायण’ प्रगाढ श्रद्धेचे निधान आहे, तसेच ओडिशामध्ये ‘जगमोहन रामायण’ तथा ‘दंडी रामायण’ लोकश्रद्धेचा-भक्तीचा मेरूमणी आहे. या रामायणाने उत्कल प्रदेशात भक्तिपंथाचा उत्कर्ष झाला व एका नव्या सांस्कृतिक मन्वंतराचा श्रीगणेशा झाला.
‘जगमोहन रामायण’ लिहिणार्या महाकवीचे नाव आहे संतकवी बाबा बलरामदास! (इ.स.1474-1522). ‘जगमोहन’ हे भगवान जगन्नाथाचे-प्रभू श्रीकृष्णाचेच एक विशेषनाम. जगाला मोहून टाकणारा ‘जगमोहन!’ भगवान जगन्नाथाचे ‘पाच प्रमुख सखा’ म्हणून पाच वैष्णव कवींना ओडिशामध्ये विशेष मान व स्थान आहे. त्या ‘पाच सखां’पैकी पहिले व प्रमुख सखा (मित्र) ‘जगमोहन रामायण’कर्ते संतकवी बाबा बलरामदास आहेत. ही या कवीची आध्यात्मिक उंची व थोरवी आहे. कवी बलरामदास हे जन्माने शूद्र होते, पण कर्माने-आचरणाने ब्राह्मण होते. साक्षात्कारी थोर ज्ञानोपासक विद्वान होते. त्यांनी भगवद्गीतेवर उडिया भाषेत सुलभ-सोपे भाष्य लिहून ब्रह्मविद्येची उडिया जनमानसात गंगा प्रवाहित केली. जे महान क्रांतिकार्य तेराव्या शतकात महाराष्ट्रभूमीत संत तत्त्वज्ञ ज्ञानदेवांनी केले, तसेच अपूर्व कार्य संतकवी बलरामदास यांनी ओडिशात केलेले आहे. थोडक्यात, कवी बलरामदास हे ओडिशाचे ज्ञानदेव-तुकाराम यांच्यासारखे युगपुरुष आहेत आणि एवढे असून ते दास आहेत. हा इष्टदेवतेप्रतीचा दास्यभाव हीच त्याच्या भक्ती थोरवीची साक्ष आहे.
‘जगमोहन रामायणा’ला अनेक साहित्यिक-समीक्षक ‘दंडी रामायण’ म्हणून ओळखतात. ‘दंडी’ हा ओडिशा साहित्यातील एक प्रसादयुक्त छंद आहे. महाराष्ट्रातील अभंग-ओवी प्रमाणेच ‘दंडी’ एक काव्यविधा आहे. ‘जगमोहन रामायण’ हे ‘दंडी’ छंदात रचले असल्यामुळे त्या रचना वैशिष्ट्यांवर या रामायणाला ‘दंडी रामायण’ म्हणून ओळखले जाते.
संतकवी बलरामदास यांना ओडिशामध्ये ‘राष्ट्रकवी’ मानले जाते. त्यांच्या प्रेरणेने ओडिशात पुढे अनेक कवींचा उदय झाला. म्हणून बलरामदासांना ‘कवींचे कवी’ असे सर्वोच्च स्थान आहे. खरं तर कवी बलरामदास हे भगवान जगन्नाथाचे म्हणजेच श्रीकृष्णाचे एकनिष्ठ भक्त आहेत. त्यांनी जगन्नाथ मंदिरात, जगन्नाथ विग्रहासमोरील मंडपात बसून हे रामाची स्तुती गाणारे रामायण लिहिले. या कृती मागील उदात्त व्यापक विचार, हा सनातन हिंदू अद्वैत दर्शनाचा तत्त्वविचार आहे. ईश्वर एक आहे. राम, कृष्ण व अन्य सारी देव-देवतांची रूपे या एकाच ईश्वराची अनंत रूपे आहेत, असे ते अद्वैत तत्त्व आहे. भक्ती आंदोलनातील सर्वच संतांनी अद्वैत तत्त्वाचा प्रचार करीत सामाजिक ऐक्य समरसता निर्माण करण्याचे राष्ट्रीय कार्य केलेले आहे. ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।’ अशा बोधाचा उद्घोष करीत सकलसंतांनी हरि-हर भेद, सगुण-निर्गुण भेद, उंच-नीच भेद अशा सार्या भेदांना मूठमाती देण्याचे ऐतिहासिक कार्य कले. ‘जगमोहन रामायण’ लिहिणारे संतकवी बलरामदास त्यापैकी एक अग्रणी मानले जातात. ते स्वतःला ‘कृपासिद्ध मत्तबलराम’ म्हणून घेण्यात धन्यता मानतात. मत्त म्हणजे वेडा. जगन्नाथ भक्तीचा वेडा आणि जगन्नाथांच्या कृपाप्रसादाने सिद्ध म्हणून कृपासिद्ध. मत्त आणि कृपासिद्ध या दोन शब्दात ‘दंडी रामायण’कार कवी बलरामदासांची थोरवी दडलेली आहे. मंदिर वास्तुरचनेमध्ये देवतेच्या गाभार्या पुढील मंडपाला ‘जगमोहन’ म्हटले जाते, ते या बलरामकवीचे चिरंतन स्मरण आहे.
15व्या शतकात राजा प्रतापरूद्र देव यांच्या दरबारी सन्मानित कवी बलरामदास यांचे ‘जगमोहन रामायण’ हे शिवपार्वती संवादरूप आहे. उडिया भाषेतील सर्वश्रेष्ठ महाकाव्य असलेल्या या रामायणात साता कांडे आहेत आणि तब्बल 1 लाख, 90 हजार एवढी प्रचंड संख्येत दंडी (ओव्या) आहेत. एका दंडीत 14 अक्षरे असणारे हे वृत्त आहे. वाल्मिकी रामायणातील पुत्रकामेष्टी यज्ञापासून ‘जगमोहन रामायणा’चा श्रीगणेशा होतो. हे रामायण मुद्रित झाले असून 800 ते एक हजार पानांचे सात खंड आहेत. धर्मांध यावनी अत्याचार सोसलेल्या व पाहिलेल्या कवी बलरामदासाने त्या अनुभवाद्वारे ‘जगमोहन रामायणा’तील ‘युद्ध कांड’ खूप सविस्तरपणे लिहिले आहे. राम-रावणाच्या युद्धाचे वीररस परिलुप्त वर्णन योद्ध्या रघुवीराचे उत्कट भव्य दिव्य दर्शन आहे. हे ‘जगमोहन रामायण’ गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरित मानस’ रामायणा आधीचे आहे.
जगमोहन रामायण पढे, कहे, सुने।
हनुमान स्वयं दौडे चले आये॥
‘जगमोहन रामायणा’मध्ये ‘आदिकांड’, ‘अयोध्याकांड’, ‘वनकांड’, ‘किष्किंधाकांड’, ‘सुंदरकांड’, ‘युद्धकांड’ आणि ‘उत्तरकांड’ नावाची सात कांडे आहेत. ‘जगमोहन रामायणा’वर अनेक भाष्य ग्रंथ, संक्षिप्त संकलन ग्रंथ, टीका ग्रंथ आहेत.
‘जगमोहन रामायण’कार कवी बलरामदास यांना फक्त 48 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या नावावर ‘लक्ष्मीपुराण’, ‘गुप्त गीता’ (वेदांत सार), ‘अमरकोश गीता’, ‘श्रीमद् भगवद्गीता’,‘विराट गीता’, ‘गरुड गीता’, ‘अनंत गीता’, ‘उद्धव गीता’, ‘लिंग पुराण’, ‘ब्रह्म पुराण’ अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. महाकवी बलरामदास हे ओडिशाचे वाल्मिकी ऋषीच आहेत.
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील लेखात : असमिया भाषेतील ‘माधव कंदली रामायण’)