मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे कृपया मला फोन करू नका, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
अंजली दमानिया या अनेक दिवस महाराष्ट्रात आम आदमी पक्षात कार्यरत होत्या. दरम्यान, यंदा अनेक वर्षांनंतर आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला असून भाजपला दिल्लीत सत्ता मिळवण्यात यश आले आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी पोस्ट केली.
हे वाचलंत का? - दिल्लीकरांवरचे 'आप'चे संकट दूर! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
दमानियांच्या पोस्टमध्ये काय?
"आज आम आदमी पार्टीचा पराभव झाला. एका विचारधारेचा पराभव झाला. माध्यमांना विनंती की, कृपया मला प्रतिक्रिया देण्यासाठी फोन करू नये. मी या विषयी बोलणार नाही," असे अंजली दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
आतापर्यंत पुढे आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, दिल्ली विधानसभेत भाजप ४७ जागांवर आघाडी असून सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचले आहेत. तर आम आदमी पक्ष मात्र, २३ जागांवर पिछाडीवर आहे. याशिवाय दिल्ली विधानसभेत काँग्रेसचा सुपडासाफ झाला असून एकही जागा निवडून आलेली नाही.