मुंबई : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा महोत्सव असेल.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "सन २०२७ मध्ये नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा धार्मिक सोहळा असल्याने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणाकडून सूक्ष्म नियोजन असणे गरजेचे आहे. या कुंभमेळ्याच्या आयोजनच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ग्लॅम्पिंग महोत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे."
"नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडणार आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हा महोत्सव प्रायोगिक तत्वावरील कुंभमेळ्याची तयारी आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक त्र्यंबकेश्वर ‘रीलिजिअस हब’ म्हणून विकसित व्हावे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. या दृष्टीने तीर्थक्षेत्र पर्यटनाद्वारे नाशिक आधुनिक शहर होण्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार आहे," असे त्यांनी सांगितले.
ग्लॅम्पिंग महोत्सवात काय?
पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास व्यवस्थेची उभारणी, स्थानिक संस्कृतीचे दर्शन, पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी असे विविध साहसी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासोबतच इथे स्थानिक बचतगटांचे हस्त कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री दालन असून स्थानिक खाद्यसंस्कृती तसेच खाद्य महोत्सव दालनही आहे. नाशिक परिसरातील विविध प्रेक्षणीय स्थळे, पुरातन मंदिरांचे दर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध आहे. या महोत्सवात पर्यटकांना ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, रिव्हर राफ्टींग यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही घेता येईल. भागधारक,ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे, पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, व्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट यांचा सहभाग असलेला परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.