मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kameshwar Chaupal Passes Away) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल यांचे शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामेश्वर चौपाल श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सदस्य बिहारचे माजी विधान परिषद सदस्यही होते. दीर्घकाळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. गुरुवारी मध्यरात्री रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच विश्व हिंदू परिषदेने त्यांना पहिल्या कारसेवकाचा दर्जा दिला होता.
हे वाचलंत का? : यशस्वी हिंदू समाज घडवण्यासाठी आपली ताकद ओळखा
श्रीराम मंदिर आंदोलनादरम्यान, कामेश्वर चौपाल हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे आजीवन सदस्य होते. त्यांनी दि. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीत पहिली वीट रचली होती. कामेश्वर चौपाल हे बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील रहिवासी असून ते एका दलित समाजातून आले होते. त्यांचे शिक्षण मधुबनी जिल्ह्यात झाले. येथेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्कात आला. त्यांचे एक शिक्षक संघाचे कार्यकर्ता होते. संघाशी संबंधित याच शिक्षकाच्या मदतीने कामेश्वर चौपाल यांना त्याकाळी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते संघाला पूर्णपणे समर्पित झाले. यानंतर त्यांना मधुबनी जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक बनवण्यात आले होते.