महाकुंभात अग्नितांडव सुरूच; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

07 Feb 2025 19:12:34

Fire broke out in Mahakumbh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Fire Broke Out in Mahakumbh) 
महाकुंभ परिसरातील जुन्या जीटी रोडवर असलेल्या स्वामी हरिहरानंद आणि सुखदेवानंद यांच्या शिबिरीत शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.

हे वाचलंत का? : भारताशी नाळ जोडलेले पाकिस्तानी हिंदू बांधव महाकुंभात

मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २० ते २२ तंबू जळून खाक झाले. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच उत्तर झुंसी विभागीय पोलीस अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस आणि न्यायदंडाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत आगीच्या कारणाचा तपास सुरू केला. भाविकांनी सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
महाकुंभला 'अग्नि दुर्घटना रहित क्षेत्र' बनवण्यासाठी ६६.७५ कोटी रुपयांची तरतूद
महाकुंभात आगीच्या घटना रोखण्यासाठी मेळाव्या परिसरात ५० अग्निशमन केंद्र आणि २० अग्निशमन चौक्या तयार केल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ४,३०० फायर हायड्रंट बसवण्यात आले आहेत. महाकुंभला 'अग्नि दुर्घटना रहित क्षेत्र' बनवण्यासाठी ६६.७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर विभागीय बजेट ६४.७३ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे, आगीशी संबंधित अपघातांपासून संरक्षणासाठी एकूण १३१.४८ कोटी रुपये खर्चाची वाहने आणि उपकरणे महाकुंभमेळ्यात तैनात करण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या ३५१ हून अधिक अग्निशमन वाहने आणि २००० हून अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. एवढेच नाही तर मेळा सुरू होण्यापूर्वी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्यासोबत अनेक मॉक ड्रिलही आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यांचे अपघात रोखण्यात महत्त्वाचे योगदान होते.

Powered By Sangraha 9.0