नागपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांना ३१ मार्च पूर्वी मंजुरी - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

06 Feb 2025 23:01:32

Chandrashekhar Bawankule
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या सुधारित पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने येत्या ३१ मार्च पूर्वी मंजुरी द्यावी, अशी सूचना महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. प्रलंबित असलेल्या विविध पाणी पुरवठा योजना तातडीने आणि दर्जेदाररित्या पूर्ण करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर मार्फत पाणी वितरणाचे सुयोग्य नियोजन करावे असे निर्देशही त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांबाबत मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, राज्य पाणी व स्वच्छता अभियानचे संचालक ई. रविंद्रन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूरचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला. जल जीवन अभियानांतर्गत आठ सुधारित योजनांपैकी तीन योजनांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित पाच योजनांना पाणी पुरवठा विभागाने ३१ मार्च पूर्वी मंजुरी देण्याचा सूचना मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रस्तावित अतिरिक्त पाणी पुरवठा योजनांना देखील निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा योजनांची सुरू असलेली कामे दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचे निर्देश देऊन मंत्री श्री. बावनकुळे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य पाणी व स्वच्छता अभियान मार्फत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. हा निधी केंद्र सरकार मार्फत मिळणार असून तो प्राप्त होताच वितरित केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0