भारतीयांच्या सोनेप्रेमावर जागतिक मान्यतेची मोहोर

05 Feb 2025 14:27:34



gold

 

नवी दिल्ली : भारतीयांचे सोनेप्रेम सर्वश्रुतच आहे. कुठल्याही सणाला, विशेषत: साडेतीन मुहुर्तांच्यावेळी सोनेखरेदीसाठी सोनारांच्या दुकानांच्या बाहेरील लोकांची रीघ आपल्याला काही नवीन नाही. भारतीयांच्या सोनेप्रेमावर जागतिक मान्यतेची मोहोर उमटली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल कडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार भारताने २०२४ ५६३.४ टनांची दागिने खरेदी करत जगात दागिनेखरेदीत पहिला क्रमांक पटकावला. आता दुसऱ्या क्रमांकावर ५११.४ टन दागिनेखरेदीसह चीन असणार आहे. एकूण सोनेखरेदीतही भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. भारताच्या एकूण सोनेखरेदीत एकाच वर्षात तब्बल ५ टक्क्यांची वाढ होत २०२३ मध्ये असलेल्या ७६१ टनांवरुन २०२४ मध्ये ८०२ टनांवर गेली आहे. भारतीयांच्या सोनेखरेदीचा कल हा स्वत:च्या वापरासाठी करण्यापेक्षा एक गुंतवणुक म्हणुन त्याकडे बघण्याचा कल वाढतो आहे असे हा अहवाल सांगतो.

 

२०२४ या एकाच वर्षात सोन्याच्या किंमतीत तब्बल २४ टक्क्यांची वाढ झाली होती. या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच अजून ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. तरीही भारतीयांचा सोने खरेदीकडचा कल कमी झालेला नाही असे हा अहवाल सांगतो. या जास्त खरेदीमागे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून होत असलेली खरेदीही कारणीभूत आहे. जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अर्थसंकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेकडूनही सोनेखरेदीचाच पर्याय निवडला जातो. त्याचप्रमाणे सामान्य गुंतवणुकदारांकडूनही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनेखरेदीलाच पसंती असते.

 

जागतिक अर्थकारणावरील संकटाचे ढग अजुनही शमायला तयार नाहीत. अमेरिकेकडून चीन, कॅनडा, मेक्सिको यांच्यावर लादलेल्या आयातशुल्कामुळे अर्थकारणात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीची लोकप्रियता नजीकच्या काळातही कमी होण्याची शक्यता नाही असे जागतिक निरीक्षकांचे मत आहे.

 


Powered By Sangraha 9.0