शेअर बाजाराची तीन आकडी उसळी, गुंतवणुकदारांना छप्पर फाडके लाभ

04 Feb 2025 18:14:10



share


मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी मंगळवारचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला. भारतीय अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अमेरिकेने सुरु केलेल्या आयातशुल्कवाढीला दिलेला थोडासा ब्रेक या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शेअर बाजाराने १३९७ अंशांची उसळी घेतली. बाजाराने ही जबरदस्त उसळी घेतल्याने गुंतवणुकदार खऱ्या अर्थाने मालामाल झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, चीन, कॅनडा या देशांवर लादलेल्या आयातशुल्कवाढीला त्यांनी विराम दिला आहे. यामुळे जागतिक अर्थकारणावर पसरलेले चिंतेचे ढग काहीसे दूर झाले आहेत. अमेरिकेने सध्या चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे.

 

शेअर बाजाराने मंगळवारी ७८ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. निफ्टीमध्येही ४०२ अंशांची वाढ होत २३,७६२ अंशांचा टप्पा गाठला गेला. सर्वच क्षेत्रांनी मंगळवारी तेजी अनुभवली. इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. या शिवाय धातूनिर्मिती, फार्मा तसेच आरोग्यविषयक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तसेच एफएमसीजी क्षेत्रानेही आज जबरदस्त तेजी अनुभवली.

 

शेअर बाजारातील या जबरदस्त उसळीमागे भारतीय अर्थसंकल्पातील तरतुदीही कारणीभूत आहेत. देण्यात आलेली घसघशीत करसवलत, भारतीय बाजारा मागणी वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहे. याच बरोबर जेष्ठ नागरीकांना मिळालेली टीडीएसमधील सुट, भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीला मिळालेले प्रोत्साहन यांमुळे गुंतवणुकीला मिळणारे प्रोत्साहन हेही एकूणच अर्थव्यवस्थेचा उत्साह वाढवणारे ठरले.

 

जागतिक बाजारातही अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्कवाढीला थोडासा विराम दिला आहे. त्यामुळे जागतिक महागाई उसळण्याचा धोकाही होता यासगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेला थोडा दिलासा मिळणार आहे. यासगळ्याचे चांगले पडसाद उमटले आहेत.

 
 
 
Powered By Sangraha 9.0