चिंताजनक! पुण्यात 'जीबीएस'बाधितांचा आकडा दीडशे पार

03 Feb 2025 12:35:06
 
GBS
 
पुणे : (GBS Outbreak) राज्यात वेगाने पसरलेल्या जीबीएस या आजारामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज जीबीएसबाधितांच्या संख्येत ९ ते १० रुग्णांची वाढ होत आहे. गुईलेन बॅरे सिंड्रोम च्या प्रकरणांमध्ये गेल्या तीन आठवड्यांत सातत्याने वाढ होत असून रविवारी आणखी नऊ नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर ही संख्या १५८ वर पोहोचली असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अहवालात देण्यात आली.
 
पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली असून, रविवार दि. २ फेब्रुवारीला आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण 'जीबीएस' बाधितांची संख्या १५८ वर पोहोचली आहे. यामधील २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुण्यात या आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर सोलापूरात एकाने जीव गमावला आहे.
 
डबल्यूएचओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने नुकतेच शहरातील काही प्रभावित भागांना भेट दिली असून स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांसोबत मिळून आरोग्य कर्मचाऱ्यांना सक्रिय रुग्ण शोधण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे प्रत्येक संशयित रुग्ण ओळखला जाईल, निदान होईल आणि योग्य उपचार मिळतील, याची खात्री केली जात आहे. डबल्यूएचओ जिल्हा आणि राज्य पातळीवरील टीम्सना तांत्रिक आणि क्षेत्रीय मदत दिली जात आहे. तसेच प्रतिसाद देणाऱ्या तज्ज्ञांना आवश्यक संसाधने, प्रशिक्षण आणि समर्थन प्रणाली प्रदान करत आहे, असं डबल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रोडेरिको एच. ऑफ्रिन यांनी निवेदनात म्हटलं आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0