ब्रिटिशकालीन जागतिक वारसा इमारती मुंबईची शान वाढवत असताना, आज मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, वांद्रे-वरळी सी लिंक यांसारखे भव्य अभियांत्रिकी अविष्कारही जागतिक स्तरावर आपली मान उंचावत आहेत. अशावेळी मुंबईतील १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जीर्णावस्थेत असलेल्या मुंबईतील अनेक रेल्वे आणि रस्ते उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या सौंदर्यात भर घालणार्या प्रस्तावित चार रस्ते उड्डाणपुलांचा आढावा घेणारा लेख.
मुंबईतील १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जीर्ण अवस्थेत असलेल्या मुंबईतील अनेक रेल्वे आणि रस्ते उड्डाणपुलांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका, ‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ लि.’ जो महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे, त्याच्या माध्यमातून जुन्या पुलांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यमान वाहतुकीत कोणताही अडथळा न आणता, या जुन्या पुलांना केबल स्टेड पुलांमध्ये रूपांतरित करणे प्रस्तावित आहे. या जुन्या पुलांना लागूनच नवीन पूल बांधला जाईल आणि नंतर विद्यमान जुना पूल पाडून नवीन पूल बांधला जाईल. याशिवाय, विद्युतीकरणासाठी आवश्यक क्लिअरन्स राखण्यासाठी सुधारित रेल्वे नियमांप्रमाणे रेल्वे रुळांपेक्षा आवश्यक उंचीसह नवीन केबल स्टेड पूल प्रस्तावित करण्यात येत आहेत. या पुलांची बांधणी झाल्यानंतर हे केबल स्टेड पूल मुंबईतील वाहतूक तर सुरळीत करतीलच, मात्र मुंबईच्या सौंदर्यातदेखील भर टाकणारे असतील.
एलईडी रोषणाईने उजळणार मुंबईचे पूल
उत्कृष्ट अभियांत्रिकीचा नमुना असलेल्या या पुलांवर अत्याधुनिक, सजावटीच्या एलईडी सिग्नेचर थीम लाईटिंगचा वापर केला जाणार आहे, जो त्या भागातील नैसर्गिक परिसराशी मिळता-जुळत असेल. ही रोषणाई या पुलांना अधिक आकर्षक साज चढवेल . रात्रीच्या वेळी सुरक्षितता आणि दृश्यमानता सुनिश्चित करण्यासाठी पुलांवर रिमोट कंट्रोल्ड आर्किटेक्चरल एलईडी लाईटिंग बसवण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या विशेष प्रसंगी या पुलावर तिरंगी प्रकाशयोजना केली जाईल. या पुलांच्या डिझाईनमध्येच काही विशिष्ट सेल्फी पॉईंट्स समाविष्ट केले आहेत. हे सेल्फी पॉईंट्स जगभरातून आणि देशभरातून आलेल्या पर्यटकांना मुंबईतील कायमस्वरूपी आठवणी निर्माण जपून ठेवण्यास, संस्मरणीय क्षणांना आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी सुरक्षित जागा प्रदान करतील.
दादर टिळक पूलआरओबी
दादरचा टिळक पूल हा दादरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडतो. यासोबतच लोअर परळ, प्रभादेवी आणि वरळी ते पूर्वेकडील द्रुतगती महामार्गापर्यंत वाहतुकीला मोठा मार्ग प्रदान करतो. या पुलासाठी सर्व पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर लॉन्चिंग आणि सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतिपथावर आहे. आजपर्यंत दादर टिळक पूल येथे केबल स्टेड रोड ओव्हर पुलासाठी खांब बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. विद्यमान पूल हा एक महत्त्वाचा दुवा असल्याने, ‘महारेल’ने हा पूल दोन टप्प्यांत बांधण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात, जुन्या पुलाला लागून असलेल्या नवीन पुलाचे बांधकाम विद्यमान वाहतुकीला अडथळा न आणता पूर्ण केले जाईल. त्यानंतर वाहतूक नवीन पुलाकडे वळवली जाईल आणि जुना पूल पाडला जाईल. दुसर्या टप्प्यात केबल स्टेड पुलाच्या दुसर्या बाजूची पुनर्बांधणी पूर्ण केली जाईल.
पुलाची वैशिष्ट्ये
या ट्विन केबल स्टेड पुलाच्या प्रत्येक भागाची एकूण लांबी ६०० मीटर आहे आणि प्रत्येक भागाची रुंदी १६.७ मीटर आहे. ये-जा करण्यासाठी ३ + ३ लेन असतील. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास आणि गर्दी कमी होण्यास मदत होईल. या पुलाच्या बांधकामाचा एकूण अंदाजित खर्च हा ३७५ कोटी रुपये आहे.
घाटकोपर आरओबी
हा प्रकल्प घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्वेला जोडतो, जो गोळीबार रोड जंक्शनपासून पूर्व एक्सप्रेस वे जंक्शनपर्यंत सुरू होतो. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. यात पहिला टप्पा-पुलाचा रेल्वे भाग आणि दुसरा टप्पा-रेल्वे नसलेला भाग आहे. या पुलाला पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेकडून निधी दिला जात आहे. प्रकल्पाच्या नियोजनानुसार, जरी प्रकल्पाचे दोन टप्प्यांत विभाजन केले गेले असले, तरी या ‘आरओबी’च्या नव्याने बांधलेल्या उजव्या बाजूवर वाहतूक योग्यरित्या वळवून प्रथम प्रकल्पाच्या उजव्या बाजूचा आणि नंतर डाव्या बाजूचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. या ‘आरओबी’ प्रकल्पात भूमिगत हायस्पीड रेल प्रकल्प आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पाची ओव्हरहेड लाईन-४ असे काही इतर प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे, रेल्वे मार्गिका ओलांडणारे १०८ मीटर लांबीचे दोन स्पॅन आहेत. ९२ मीटर लांबीचे बो स्ट्रिंग स्टील स्पॅन हे हाय-स्पीड रेल अलाईनमेंटवर आहेत. जंक्शन क्षेत्रात वाहतुककोंडी टाळण्यासाठी एलबीएस जंक्शनवर अंदाजे ९० मीटर लांबीचा आणखी एक लांब स्पॅन प्रस्तावित आहे. पुलाच्या अलाईनमेंटमधील स्पॅन लांबीच्या आधारे पीएससी बॉक्स गर्डर, पीएससी आय-गर्डर, स्टील कंपोझिट गर्डर, स्टील गर्डर इत्यादींसाठी या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रस्तावित पुलाच्या खाली सर्व्हिस रोडही असतील, स्थानिक प्रवाशांच्या आणि पादचार्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व बाजूंनी फूटपाथ असतील.
रे रोड पूल
रे रोड येथील केबल स्टेड उड्डाणपुलाचे (आरओबी) काम पूर्णत्वाकडे आहे. हा पूल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई उपनगरातील हा दुसरा केबल स्टेड रोड उड्डाणपूल असेल, जो लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. रे रोड येथे बांधण्यात आलेल्या पुलासाठी विशिष्ट अभियांत्रिकी कौशल्ये वापरण्यात आली आहे. हा पूल ‘महारेल’ने केबल्सच्या मदतीने मर्यादित खांबांसह डिझाईन केला आहे. याला ‘सेगमेंटल’ बांधकाम पद्धत असे म्हणतात, ज्यामध्ये किमान बांधकाम वेळेत चांगल्या दर्जाच्या पुलाची उभारणी शक्य होते. यातील ‘सेगमेंट फॅब्रिकेशन यार्ड’मध्ये प्रीफॅब्रिकेट केले जातात आणि उभारणीसाठी साईटवर नेले जातात. या नवीन केबल स्टेड पुलावर पादचार्यांसाठी फूटपाथ असतील, त्याचसोबत सहापदरी मार्ग वाहतूक सुरळीत करेल. या केबल स्टेड आरओबीचे बांधकाम दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाले.
पुलाची वैशिष्ट्ये
लांबी : ३८५ मीटर, २ डाऊन रॅम्पसह
प्रकल्पाची अंदाजे किंमत - २६६ कोटी
मार्गिका : ६
प्रकल्पाची एकूण लांबी - १.५२ किमी
सेल्फी पॉईंट्स - १
भायखळा आरओबी
या केबल स्टेड पुलावर चार अतिरिक्त मार्गिका असतील, ज्या मार्गिका शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करतील. मार्गाचे हे विस्तारीकरण केवळ गर्दी कमी करण्यासाठी नाही, तर मुंबईकरांचा प्रवास अधिक कार्यक्षम करण्यासाठीदेखील फायदेशीर ठरणार आहे. भायखळा येथे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत व्यत्यय न आणता, या पुलाचे काम सातत्याने सुरू आहे. फोर्ट ते मुंबई उपनगरांमध्ये किंवा भायखळा रेल्वे स्थानकाजवळ प्रवास करताना, आपल्याला या कामाची झलक पाहायला मिळते. नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर, विद्यमान पुलावरील वाहतूक नवीन पुलाकडे वळवली जाईल. याचाच एक भाग म्हणून विद्यमान पुलाचा एक स्पॅन तोडला जाईल आणि नवीन केबल स्टेड ब्रिजला जोडला जाईल. ‘महारेल’चे हे काळजीपूर्वक नियोजन विद्यमान भायखळा रास्ता उड्डाणपुलाचे ऐतिहासिक महत्त्व वाढवेल. तसेच छशिमटकडे जाणारी आणि येणारी वाहतूक अखंडपणे सुरूच ठेवत नव्या मार्गाला जोडली जाईल.
पुलाची वैशिष्ट्ये
लांबी - ९१६ मीटर (पद्धतींसह)
पुलाची उंची - ९.७० मीटर
पायलॉनची उंची - ५० मीटर
मार्गिका - ४ लेन (विद्यमान आरओबीव्यतिरिक्त)
किंमत - २८७ कोटी रुपये
सेल्फी पॉईंट्स - १