मराठी साठी महायुती सदैव तत्पर एकनाथ शिंदे

28 Feb 2025 16:10:48

Mahayuti is always ready for Marathi Eknath Shinde  
 
मुंबई: (Eknath Shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
 
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी कार्यरत असणार्‍या मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार सोहळा गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, कौशल्य रोजगार विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, आदी मान्यवर उपस्थितीत होते.मराठी साहित्यजगतातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मराठी भाषेच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असणार्‍या प्रकाशन संस्था, लेखक, संशोधक यांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मराठी साहित्य संस्कृतीचा जागर मांडणार्‍या मराठी बाणा या कार्यक्रमाचे सादरीकरण अशोक हांडे व त्यांच्या गटाने सादर केले.
 
सारस्वतांचा सन्मान सोहळा
 
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रौढ वाङ्मयातील ‘कवी केशवसुत पुरस्कार’ एकनाथ पाटील यांना प्रदान करण्यात आला. नाटक, एकांकिका या विभागातील ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ मकरंद साठे यांना प्रदान करण्यात आला. कादंबरी या साहित्य प्रकारासाठी असलेला ‘ह. ना. आपटे पुरस्कार’ आनंद विंगकर यांना प्रदान करण्यात आला. लघुकथा या साहित्य प्रकारासाठी असलेला ‘दिवाकर कृष्ण पुरस्कार’ दिलीप नाईक निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. ललितगद्य (ललित विज्ञानासह) देण्यात येणारा ‘अनंत काणेकर पुरस्कार’ अंजली जोशी यांना प्रदान करण्यात आला. ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते प्रौढ वाङ्मयातील विनोदासाठी देण्यात येणारा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ शेखर गायकवाड यांना देण्यात आला. चरित्र या प्रकारासाठी देण्यात येणारा ‘न. चि. केळकर पुरस्कार’ विवेक गोविलकर यांना प्रदान करण्यात आला. आत्मचरित्र या विभागासाठी देण्यात येणारा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ डॉ. वसंत राठोड यांना देण्यात आला. प्रौढ वाङ्मय-समीक्षा वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र, ललितकला, आस्वादपर लेखन यासाठी देण्यात येणारा श्री. के. क्षीरसागर पुरस्कार लेखक समीर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. 
 
मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या हस्ते प्रौढ वाङ्मयातील इतिहास या विभागात देण्यात येणारा ‘शाहू महाराज पुरस्कार’ प्रकाश पवार यांना प्रदान करण्यात आला. प्रौढ वाङ्मय-भाषाशास्त्र, व्याकरण या विभागात देण्यात येणारा ‘नरहर कुरुंदकर पुरस्कार’ उज्ज्वला जोगळेकर यांना देण्यात आला. प्रौढ वाङ्मय-विज्ञान व तंत्रज्ञान या विभागात देण्यात येणारा ‘महात्मा जोतीराव फुले पुरस्कार’ लेखक सुबोध जावडेकर यांना प्रदान करण्यात आला. प्रौढ वाङ्मय-उपेक्षितांचे साहित्य यासाठी देण्यात येणारा ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ सुनिता सावरकर यांना प्रदान करण्यात आला.‘साहित्य संस्कृती मंडळा’चे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते प्रौढ वाङ्मय-तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विभागातील ‘ना. गो. नांदापूरकर पुरस्कार’ लेखक या. रा. जाधव यांना देण्यात आला. शिक्षणशास्त्र विभागातील ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’ लेखक हेमंत चोपडे यांना प्रदान करण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0