कुसुमाग्रजांच्या गावात पुढल्या वर्षापासून कुसुमाग्रज महोत्सव
शरवाडे-वणी कवितांचे गाव म्हणून घोषित
मराठी भाषामंत्री उदय सामंत यांची घोषणा
28-Feb-2025
Total Views |
नाशिक: (Uday Samant) मराठी भाषेला सातासमुद्रापार नेण्यास हातभार लावणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या नावाने त्यांच्या मूळ गावी शिरवाडे-वणी येथे कुसुमाग्रज महोत्सव होणार आहे. हा महोत्सव पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार असून तो दोन दिवस चालेल अशी घोषणा उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली.
गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विभाग, ‘राज्य मराठी भाषा विकास संस्था’ आणि शिरवाडे-वणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रजांच्या मूळ गावाला कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले. यासोबतच तेथे कवितेच्या एका दालनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. व्यासपीठावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, ‘राज्य मराठी विकास संस्थे’चे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, सरपंच दिलीप खैरे, माजी आ. हेमंत टकले, ‘मराठा विद्याप्रसारक समाज संस्थे’चे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, वि. वा. शिरवाडकर यांच्या नात पिहू शिरवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते, तर निफाडचे आ. दिलीप बनकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मराठी अध्यासन सुरू होणार
नवी दिल्ली येथील ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’त ‘छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि गनिमी कावा’ या विषयावर राज्य शासनाने अध्यासन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आता कुसुमाग्रजांचे मराठी अध्यासनही सुरू करण्यात येणार असून लवकरच कार्यान्वित होईल. आगामी काळात बाल, युवक आणि महिलांसाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येईल. तसेच कवी विंदा करंदीकर साहित्यभूषण पुरस्कार वितरण सोहळा व्यापक स्तरावर घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. मराठी भाषा विभागातर्फे संत तुकाराम महाराज यांचे सर्व अभंग ई-बुक स्वरूपात लवकरच आणले जाणार आहेत.
कुसुमाग्रजांचे साहित्य अभ्यासासाठी उपलब्ध होईल
या दालनांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे साहित्य अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहे. कुसुमाग्रजांचे जन्मगाव शिरवाडे-वणीच्या विकासासाठी शासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी ग्रामपंचायतीने आराखडा तयार करावा. त्यानुसार निधीच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील. तसेच मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.