महाबळेश्वरमध्ये 'क्रिकेट फ्रॉग'ची नवी प्रजात; पार्किंगमध्ये साठलेल्या पाण्यात सापडला बेडूक

27 Feb 2025 19:43:03
frog discovered from mahabaleshwar



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पर्यटनाच्या केंद्रस्थानी असूनही पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या महाबळेश्वरमधून बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (frog discovered from mahabaleshwar). 'क्रिकेट फ्रॉग' या सामान्य नावाने ओळखल्या जाणार्‍या 'मीनर्वारिया' या कुळातील या बेडकाचे नामकरण 'मीनर्वारिया घाटीबोरेलिस', असे करण्यात आले आहे (frog discovered from mahabaleshwar). महाबळेश्वरसारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळामधून प्रदेशनिष्ठ बेडकाच्या प्रजातीचा शोध लागणे ही त्या प्रदेशातील नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. (frog discovered from mahabaleshwar)
 
 
'मीनर्वारीया' कुळातील बेडूक पोटावरील समांतर रेघांवरुन इतर बेडकांहून वेगळे ठरतात. साठलेल्या पाण्याशेजारी किंवा छोट्या झर्‍यांच्या शेजारी बसून ते रातकिड्यांसारखा आवाज काढतात म्हणून त्यांना 'क्रिकेट फ्रॉग' या सामान्य नावाने ओळखले जाते. याच कुळातील नवन्या प्रजातीचा शोध मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ओमकार यादव. दहिवडी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अमृत भोसले, प्राध्यापिका डॉ. प्रियांका पाटील, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाचे संशोधक डॉ. के. पी. दिनेश यांनी लावला आहे. यासंबंधीचा शोधनिबंध 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून प्रसिद्ध झाला आहे. या शोधासाठी संशोधकांना ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे यांचे सहकार्य लाभले आहे.
 
 
नव्याने शोध लागलेला बेडूक महाबळेश्वरमधील कोळी आळीमधील एका खाजगी वाहनतळामध्ये साठलेल्या पाण्याच्या शेजारी आढळून आला. उत्तर पश्चिमी घाटातील आढळक्षेत्रावरुन या प्रजातीचे नामकरण 'घाटी' या संस्कृत आणि 'बोरियालिस' या उत्तरेकडील क्षेत्र दर्शवणार्‍या लॅटीन शब्दांवरुन करण्यात आले. आकाराने ५.५ सेमीपेक्षा मोठे असणार्‍या या प्रजातीचा प्रजनन काळ हा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांपुरता मर्यादित असतो. मोठा आकार, आवाजामधील वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचावरुन ही प्रजाती त्याच्या कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ठरते. ही प्रजाती निशाचर असून छोटे किटक हे तिचे मुख्य खाद्य आहे. हा शोध केवळ नवीन प्रजातीच्या यादीत एक नवीन नाव जोडण्यासाठी नसून पश्चिम घाटाच्या जैवविविधतेच्या हॉटस्पॉटमध्ये चालू असलेल्या संरक्षण प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यासाठी आहे.
 
 
नव्या प्रजातीचा प्रजनन काळ पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे ही प्रजाती यापूर्वी या भागात अभ्यास करणार्‍या इतर संशोधकांच्या निदर्शनास आली नसावी. या प्रजातीच्या नरांचा प्रजनन काळातील आवाज हा तिच्या कुळातील इतर प्रजातींच्या ज्ञात आवाजांपेक्षा अतिशय वेगळा आहे. या वेगळ्या आवाजामुळेच या बेडकांकडे आमचे लक्ष वेधले गेले. डॉ. वरद गिरी यांच्या मार्गदर्शनामुळे पुढील काम सोपे झाले. -  डॉ. ओमकार यादव, संशोधक
Powered By Sangraha 9.0