ज्याचा त्याचा कुंभ आणि दंभ!

27 Feb 2025 10:09:30
 
article on cm yogi adityanath slams opposition criticism on kumbh
 
 
कुंभमेळ्याला जाणार्‍या श्रद्धाळूंची वाहतुककोंडीबाबत काही तक्रारच नाहीच. सर्व भेदाभेद विसरून कोट्यवधी हिंदू एकत्र येऊ शकतात, ही गोष्टच विरोधकांच्या पचनी पडत नाही आहे. त्यातून एका योगी साधूने, इतक्या भव्य प्रमाणात एका हिंदू सणाचे भव्य आणि यशस्वी आयोजन केल्यानेही विरोधकांची झोप उडाली आहे.
 
प्रयागराजमध्ये भरलेल्या पूर्णकुंभाची भव्य सांगता कालच्या महाशिवरात्रीला झाली. तब्बल १४४ वर्षांनंतर भरलेल्या या महाकुंभात, ६६ कोटींपेक्षा अधिक लोकांनी श्रद्धापूर्वक स्नान केल्याचे मानले जाते. इतक्या भव्य प्रमाणावर जगात कोठेच इतकी माणसे एकत्र जमलेली दिसत नाहीत. त्यातही मानसिक आणि आध्यात्मिक समाधानाखेरीज दुसरे काहीच मिळत नसतानाही, अशा मेळाव्यात इतक्या प्रचंड प्रमाणावर सामान्य आणि गरीब-श्रीमंत लोकांनी सहभागी होणे, ही मन थक्क करून सोडणारी घटना आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर जमलेल्या गर्दीचे सुव्यवस्थित नियोजन करणे ही सुद्धा तितकीच मोठी कामगिरी असून, त्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या प्रशासनाचे, ढोल-ताशे वाजवून अभिनंदन केले पाहिजे.
 
योगी आदित्यनाथ यांनी या कुंभमेळ्यावरील टीकेला परखड आणि चपखल उत्तर देताना जे शब्द मांडले, ते लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील. विधानसभेत त्यांनी या कुंभमेळ्याच्या यशावर बोलताना सांगितले, “गिधाडांना मांस मिळाले, डुकरांना चिखल मिळाला, संवेदनशील लोकांना नात्यांचे सुंदर चित्र मिळाले, श्रद्धाळूंना पुण्य मिळाले, व्यापार्‍यांना व्यवसाय मिळाला, सज्जनांना सज्जनता मिळाली, भक्तांना परमेश्वर प्राप्ती झाली. थोडक्यात, जी व्यक्ती ज्या भावनेने या कुंभमेळ्याकडे पाहात होती, तिला तिच्या भावनेनुसार फळ मिळाले,” असा त्यांच्या बोलण्याचा उद्देश होता. सनातनींच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, इतकीच आयुष्याची इतिकर्तव्यता मानणार्‍या विरोधकांना यापेक्षा अधिक मार्मिक उत्तर दुसरे नसेल. ‘ज्यां की रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तिन तैसी’, असे तुलसीदासजींनीच म्हणून ठेवले आहे. तीच भावना योगीजींनी व्यक्त केली.
 
प्रयागराज हे प्राचीन आणि पवित्र तीर्थस्थळ असले, तरी ते एक छोटे शहर आहे. जेमतेम ४०-४५ लाख लोकवस्ती असलेल्या या शहरात भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही आलेल्या कोट्यवधी लोकांना सर्वकाळ राहणे, खाणे-पिणे आणि वीज-प्रवासाची सोय या छोट्याशा शहरात उपलब्ध होती. ६६ कोटी लोक म्हणजे निम्मा भारत, या दीड महिन्यात प्रयागराजमध्ये उपस्थित होता. त्यामुळे प्रवासाची काहीशी गैरसोय झाली, यात शंका नाही. टीका करण्यासाठी अक्कल लागत नाही. पण, इतक्या मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी, प्रशासकीय कौशल्याची गरज असते. त्याचा थक्क करणारा अनुभव कुंभमेळ्यात सहभागी झालेल्यांना जरूर आला. या काळात येथे आलेल्या बिगर हिंदूंना, कोणीही हीन आणि भेदभावाची वागणूक दिली नाही. त्यांनाही या पवित्र जळात डुबकी मारण्याची मुभा होती. त्यांच्या खाण्यात कोणी थुंकले नाही की, आपला धर्म सोडण्याचा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला नाही. त्यांच्या धर्माचा अपमान झाला नाही की, बिगर-हिंदूंना नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले नाही.
 
 या मेळाव्यानंतर कोठेही दंगली उसळल्या नाहीत की, मशिदी आणि चर्चेसवर दगडफेक करण्यात आली नाही. तेथे ब्राह्मण, राजपूत, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा विविध जातींसाठी स्वतंत्र घाट नव्हते. ज्या स्थळावर जौनपूरच्या एखाद्या गरीब परिवाराने डुबकी मारली असेल, तेथेच अंबानी परिवारानेही स्नान केले. इतकेच नव्हे, तर श्रद्धाळूंच्या या अफाट जनसागराची गैरसोय होऊ नये, म्हणून साधू-महंतांनी आपल्या काही धार्मिक परंपरांनाही मुरड घातली. शिवरात्रीपूर्वी प्रयागराजमध्ये साधूंकडून नेहमी मोठी मिरवणूक काढली जाते, ती यावेळी काढण्यात आली नाही. याआधीही मौनी अमावस्येला, साधू आणि आखाड्यांच्या मिरवणुका निघाल्या नाहीत. यामुळे सनातन धर्म धोक्यात आला किंवा बुडाला, असे कोणालाही वाटले नाही. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हाच कुंभमेळ्याचा मूलमंत्र होता.
 
सनातनींकडून सर्व धर्माच्या लोकांचे येथे स्वागतच केले जात होते. कुंभमेळ्यावर टीका करणारे नेतेही हळूच तेथे जाऊन, संगमात डुबकी मारून आपल्या पापांचे प्रायश्चित्त करताना दिसत होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कुंभमेळ्यावर आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर बेछूट टीका केली आहे. तरीही तेथे संगमात जाऊन पापक्षालन करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. तीच गोष्ट अनेक काँग्रेस नेत्यांची, अर्थात याला अपवाद एका परिवाराचा. निवडणुकीच्या काळात मंदिरांच्या पायर्‍या चढणारे, कपाळावर गंधाचे पट्टे ओढणारे आणि स्वत:ला जनेऊधारी हिंदू म्हणविणार्‍या या परिवाराचा एकही सदस्य, या मेळ्याकडे फिरकला नाही. यावरून त्यांचे हिंदुत्त्व किती बेगडी आणि सोयीस्कर आहे, तेच सिद्ध झाले. भाजप विरोधकांनी कुंभमेळ्याला न जाताच, तेथे किती गैरव्यवस्था आहे, प्रदूषण आहे, घाण आहे वगैरे बडबड केली. पण, कोट्यवधी श्रद्धाळूंनी ती ऐकूनच घेतली नाही.
 
गंगेत स्नान केल्याने गरिबी दूर होते का? असा प्रश्न विचारणार्‍या मल्लिकार्जुन खर्गे यांना, त्याचे उत्तर जनतेनेच दिले आहे. या कुंभमेळ्याला आलेल्या श्रद्धाळूंनी उत्तर प्रदेशात, तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. या कुंभमेळ्यामुळे हजारो गरिबांना विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध झाले. केवळ गरिबच नव्हे, तर व्यावसायिक विमान कंपन्यांनीही या कुंभकाळात नफेखोरीची डुबकी मारली. या कुंभमेळ्याची काल जरी सांगता झाली असली, तरी तेथे जाणार्‍यांची गर्दी इतक्यातच ओसरणारी नाही, हे स्पष्टच दिसत आहे. याशिवाय या गर्दीचा रोख प्रयागराजनंतर काशी, अयोध्येकडेही वळला आहे. त्यामुळे येते काही आठवडे, तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही जबरदस्त चालना मिळत राहणार आहे.
 
कुंभमेळ्यासारखे उत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी कोणावरही सक्ती केली जात नाही. केवळ श्रद्धावान सनातनीच नव्हे, तर अन्य धर्मीयांनाही तेथे मुक्त प्रवेश आहे. आपल्या विश्वाचा आकार केवढा, या प्रश्नावर एका नामवंताने ज्याच्या त्याच्या मेंदूएवढा असे उत्तर दिले होते. तेच अशा भव्य सणांबाबत खरे आहे. ज्याची जशी श्रद्धा आहे, त्याला तसे फळ मिळाले आहे. ज्याला या कुंभमेळ्यातून जे हवे होते, तेच मिळाले आहे. त्यामुळे ज्यांना केवळ तेथील चिखलच तुडवायचा आहे, त्यांना त्याचीही मुभा आहे. हीच सनातन मानसिकता आहे.
 
 
 
 
राहुल बोरगांवकर
 
Powered By Sangraha 9.0