सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य! मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना

27 Feb 2025 15:39:47
 
Pratap Sarnaik ST Bus
 
मुंबई : सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी दिले आहेत.
 
पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एस.टी महामंडळाची महत्त्वाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
हे वाचलंत का? -  हेल्पलाईन क्रमांकाचा प्रचार ते एसटी अधिकाऱ्यांच्या गस्ती...; पुणे अत्याचार प्रकरणी चित्रा वाघ यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन
 
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "एसटी डेपो आणि बसेसमधील महिला, जेष्ठ नागरिक आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने परिवहन विभागात एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळातील १४ हजार ३०० बसेस, ४५० इलेक्ट्रिक बसेस आणि ३५० भाडेतत्वावरील बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर बऱ्याच बस डेपोमध्ये बंद पडलेल्या बसेस आणि काही चारचाकी वाहने आहेत. काही समाजकंटक या वाहनांचा गैरफायदा घेतात. त्यामुळे येत्या १५ एप्रिलपर्यंत या सर्व बसेस आणि चारचाकी गाड्या भंगारात काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे."
 
महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणार
 
"प्रत्येक बस डेपोमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. महामंडळाकडे सध्या जवळपास २ हजार ७०० सुरक्षारक्षक आहेत. यामध्ये महिलांची संख्या फार कमी असून ही संख्या किमान १५ ते २० टक्के वाढवण्यात येणार असून सुरक्षा महामंडळाला तशी मागणी करणार आहोत."
 
सर्व बस डेपोचे ऑडिट करणार
 
एसटी महामंडळाच्या वतीने महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा मिळावी आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना आखण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व बस स्थानकांमध्ये आणि एसटीमध्ये आम्ही नवनवीन सुधारणा करणार आहोत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व बसस्थानकांचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच लवकरात लवकर शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0