पुणे : (Pune Crime Case Swargate) पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. २६ वर्षीय पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली असता ही घटना घडली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकातील परिसरात आली असता आरोपीने तरुणीच्या एकटे असण्याचा फायदा घेत तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यानेच तरुणीला बस स्थानकातील परिसरात उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे नेले. आरोपीने तिला आत जाऊन बसण्यास सांगितले. तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला. त्याने तिथे तरुणीवर बलात्कार केला व तिथून पसार झाला. गुन्हा घडल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असन त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घडलेल्या प्रसंगानंतर तरुणी फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने आपल्या एका परिचिताला फोन करुन हा सर्व प्रकार सांगितला. त्याच्या सल्ल्यानुसार तिने स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून सगळा घटनाक्रम सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे कायम वर्दळ असलेल्या स्वारगेट बसस्थानकावर हा प्रकार घडला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. पीडित तरुणीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांकडून फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध अद्याप सुरू आहे. मात्र पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांचा घटनांचा मुद्दा तापला असताना हे आणखी एक प्रकरण समोर आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे.