मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या भागात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा उघडकीस येत असून आता या घुसखोरांची पाळेमुळे सिल्लोडपर्यंत पोहोचली आहेत. बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी खान यांनी सिल्लोड येथे जन्म झाल्याचा एकही पुरावा नसलेल्या ४०६ लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत. यातील बरेच लोक हे ३० ते ६५ वर्षे वयोगटातील असून बांग्लादेशी मुस्लिम ही त्यांची पार्श्वभूमी आहे. त्यांनी आपल्या अर्जाबरोबर पुरावा म्हणून केवळ आधार कार्ड जोडले आहे. याव्यतिरिक्त भारतात जन्म झाल्याचे एकही कागदपत्र त्यांनी दिलेले नाही. अशा ४०६ जणांना सिल्लोडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जन्म प्रमाणपत्र दिले आहेत.
हे वाचलंत का? - नीलमताई बोलल्या ते कटू सत्य! खरं बोलल्यावर...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
सिल्लोड येथे २०२४ मध्ये जन्म प्रमाणपत्र मिळवण्याकरिता ४ हजार ८५५ अर्ज आले असून यातील एकही अर्ज फेटाळण्यात आला नाही. यातील ३ हजार अर्ज संशयास्पद असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्याची हकालपट्टी करून सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याची विनंती किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.