राज्यात काही जनजाती क्षेत्रं अशी आहेत, ज्याठिकाणी उघडपणे हिंदुत्वाचा जागर होताना दिसतोे. सनातन परंपरेनुसार सण-उत्सव जनजाती बांधवांकडून साजरे होत आहेत. जव्हार तालुक्यातील कौलाळे गावात ‘कौलाळेश्वर शिवमंदिर’ (Kaulaleshwar Shiv Mandir) आहे, जे परिसरातील १२ पाड्यातील जनजातींच्या श्रमदानातून उभे राहिले आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त या पांडवकालीन शिवमंदिराचा घेतलेला आढावा...
पालघरच्या जव्हार तालुक्यातील आयरे गावात असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि कळसारोहण सोहळा गेल्या वर्षाखेरीस मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी येथील जनजाती बांधवांकडून झालेला हिंदुत्वाचा जागर जनामनापर्यंत पोहोचला. याच जव्हार तालुक्यात ‘कौलाळे’ नावाचे एक गाव आहे, ज्याठिकाणी भगवान शंकराचे पुरातन मंदिर आहे. पांडवकालीन असलेले हे शिवमंदिर तसे जागृत देवस्थानच! या मंदिरामुळे गावातील १२ पाड्यांतील जनजाती वस्ती एकत्रित आली आहे. पूर्वी या मंदिरात दोन-तीन लोकच यायचे. मात्र, आता संपूर्ण गाव भगवान शिवाच्या दर्शनासाठी येऊ लागले आहे.
गावात कौलं तयार व्हायची, म्हणून गावाचे नाव ’कौलाळे गाव’. गावातील १२ पाड्यांची एकूण लोकसंख्या पाहिली, तर साधारण नऊ हजारांची लोकसंख्या असलेली वस्ती कौलाळे गावात आहे. याठिकाणी चौथीपर्यंत शाळा असून सातवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मुलांना दुसर्या ठिकाणी जावे लागते. उर्वरित माध्यमिक शिक्षण जव्हार तालुक्यात जाऊनच घेण्याची सोय आहे.
मंदिर परिसर पाहिला, तर अतिशय दुर्गम भागात असल्याने याठिकाणी फारशी रहदारी नाही. मंदिराच्या सभोवती भव्य शिळा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या आजही त्याठिकाणी अस्तित्वात आहेत. गावकरी म्हणतात, पूर्वी मंदिर परिसरात साप बर्याच प्रमाणात दिसायचे. आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. ’नवसाला पावणारा देव’ म्हणून या देवाकडे पाहिले जाते. ग्रामस्थांनी आजवर केलेले नवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे याची प्रचिती त्यांना दरवेळी आल्याचे ते सांगतात. गावात नरेंद्र महाराज, वारकरी संप्रदाय आणि रघुवीर समर्थांची आराधना करणारे असे एकूण तीन संप्रदाय आहेत. असे असूनही गावात कोणताही दुजाभाव नाही. सर्वजण अगदी एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने नांदतात.
महाशिवरात्रीला याठिकाणी सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह चालतो. यावेळी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असते. मंदिर रंगीबेरंगी पताक्यांनी सजवले जाते. हजारोंच्या संख्येने लोक महाशिवरात्रीनिमित्त होणार्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी येतात. गावातील काही ज्ञाती-बांधवांनी उर्वरित जनजाती बांधवांमध्ये अशी जनजागृती केली की, हे आपले ग्रामदैवत आहे. आपल्यालाच याची देखभाल करायची आहे. जनजाती हा निसर्गपूजक असला तरी, आपला धर्म हिंदू आहे आणि भगवान शंकर हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे निसर्गाप्रमाणे त्याची पूजा करणे ही आपली जबाबदारी आहे. हे जेव्हा विविध पाड्यांतील लोकांना पटले, तेव्हा त्यांनी सहपरिवार कौलाळेश्वर शिवमंदिरात येऊन शिवाची पूजा करण्यास सुरुवात केली आणि आजतागायत ती सुरू आहे. मंदिरात हभप रविंद्र महाराज गरेल नावाचे एक पुजारी आहेत. ते नियमितपणे भगवान शंकराची पूजा करत असतात.
मंदिरासमोर नुकताच एक सभामंडप तयार करण्यात आला आहे, ज्याठिकाणी मंदिर समिती निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असते. महाशिवरात्रीच्याच दिवशी मंदिरात घडलेला एक प्रसंग प्रत्येक गावकर्यांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. ‘अखंड हरिनाम सप्ताह’ म्हटले की सातही दिवस वीणा न थांबता, अविरतपणे वाजवावी लागते. एक दिवस असे घडले, रात्री कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण गाव झोपी गेले. वीणा वाजवणारी व्यक्ती जागी होती. थोड्या वेळाने त्या व्यक्तीने कोणी जागे आहे का, हे पाहिले, जेणेकरून दुसर्या व्यक्तीकडे ती देता आली असती. परंतु, कोणीही जागे नव्हते. त्यामुळे त्या वीणा वाजवणार्या व्यक्तीने ती वीणा एका खांबाला लटकवली आणि तो तिथून निघून गेला. त्यादरम्यान दुसर्या एका व्यक्तीस जेव्हा जाग आली, तेव्हा ती वीणा आपोआपच वाजत असल्याचे त्याने पाहिले. तेव्हाचा तो चमत्कार गावकरी कधीच विसरणार नाहीत. आज तीच वीणा मंदिरात ठेवल्याचे आपल्याला दिसते.
पूर्णतः जीर्ण झालेल्या मंदिराची काळजी गावकरी आपुलकीने घेत आले आहेत. भाविकांची मंदिरावर इतकी अपार श्रद्धा आहे की, ग्रामस्थांनी स्वश्रमदानाने कौलारू स्वरूपाचे छोटेसे मंदिर बांधण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. हिंदू धर्म जागृतीचे कार्य केवळ शहरी भागातच होत आहे, असे नाही, तर अशा मंदिरांच्या माध्यमातून दुर्गम खेड्यापाड्यांतही धर्माचे आणि सनातन परंपरेचे रक्षण जनजाती बांधवांकडून होत आहे. कौलाळेश्वर मंदिर हे त्याचेच एक उदाहरण!