मुंबई: (Nilesh Rane Malvan) भारताविरोधात घोषणाबाजी एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकाला भलतीच महागात पडली आहे. आ. निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेताच, या परप्रांतीयाच्या अनधिकृत दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. मालवण नगर परिषदेने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी ही धडक कारवाई केली. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ मध्ये रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला त्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणमधील आडवण परिसरात एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने भारतविरोधी घोषणा दिल्या. त्यामुळे स्थानिक हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त केला. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आ. निलेश राणे यांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
आ. राणे यांच्या पत्रानंतर मालवण नगर परिषद प्रशासनाने या परप्रांतीय भंगार व्यावसायिकाची अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले. मालवण नगर परिषदहद्दीतील वायरी आडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून तेथे अनेक गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्यावरही बुलडोझर फिरवला जाणार आहे.
मालवणात एका मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतविरोधी घोषणा दिल्या. आम्ही या परप्रांतीयाला जिल्ह्यातून हाकलून देणारच आहोत, पण त्याआधी त्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करून टाकला आहे. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार.