पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहात असलेल्या सोसायटीत आरोपी आवेज शेख याची आत्या राहते. 2018 मध्ये आरोपी आवेज आत्याकडे राहण्यास आला होता. त्यावेळी त्याची फिर्यादी यांच्या मुलीशी ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांच्यामध्ये चांगला संवाद निर्माण झाला. त्याचा गैरफायदा घेत आरोपी आवेज याने तिला इस्लाम धर्म चांगला असल्याचे सांगत त्याच्या धर्माविषयी अधिक माहिती दिली. तसेच, हिंदू धर्मात अनेक देव असून इस्लाममध्ये एकच असल्याचे त्याने तिला सांगितले होते. त्याच्या बोलण्याने ती प्रभावित झाली.त्यावेळी फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन होती. फिर्यादी यांना आपल्या मुलीच्या वर्तनात बदल जाणवू लागला. ती घरात नमाजपठन करायला लागली. याबाबत तिला विचारणा केली असता, तिने शेखबद्दल कुटुंबीयांना सांगितले. आपल्या अल्पवयीन मुलीला बरे-वाईटाची समज नसल्याने फिर्यादीने आरोपी आवेजला “तिच्यापासून लांब राहा,” असे सांगितले. तसेच झाल्याप्रकाराबद्दल त्याच्या आत्यालादेखील माहिती दिली. परंतु, तरीही तो मुलीशी सतत संपर्क साधत होता.
दरम्यान, दि. २७ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या पत्नीच्या मोबाईल फोनवर आयेशा सिद्धिका हैदराबाद या महिलेचा फोन आला. मुलगी ‘दरसला’ आली नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तिने दिली. त्यामुळे फिर्यादीचे कुटुंब भयभीत झाले. त्यामुळे त्यांनी आपल्यावर हल्ला होईल, या भीतीने घराबाहेर पडणे बंद केले. त्यानंतर, फिर्यादी यांनी आवेज शेख आणि आयेशा सिद्धिका हैदराबाद विरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याची नितांत गरज
“महाराष्ट्रात सध्या धर्मांतरविरोधी कायदा नाही. या प्रकरणातील मुलीला धर्मपरिवर्तनाबाबत कळावे, एवढीही तिला समज नव्हती. अखेर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याची नितांत आवश्यकता आहे. प्रेमसंबंधांतून आंतरधर्मीय विवाहांसाठी विशेष विवाह कायदा अस्तित्वात आहे. मात्र, हे प्रकरण धर्मांतर, घरातील अतिक्रमण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे आहे. आरोपीला प्रेमात रस नाही. त्याला विचारसरणी आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात अधिक रस आहे. आरोपीचा खरा हेतू स्पष्ट आहे,” असे फिर्यादीचे वकील अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. ऋतुराज पासलकर म्हणाले.
प्रकरणातील तथ्य, वस्तुस्थिती तपासू
पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल करून आम्ही तपास सुरू केला आहे. प्रकरणातील तथ्य आणि वस्तुस्थितीदेखील तपासली जात आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने याविषयी अधिक काही बोलता येणार नाही.
विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे