दिव्य प्रेरणेचा नित्य स्रोत : पूजनीय श्रीगुरुजी!

24 Feb 2025 11:20:24
second sarsanghchalak shreeguruji madhav golwalkar


विजया एकादशी हा संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर तथा श्री. पूजनीय गुरुजी यांचा तिथीप्रमाणे जन्मदिवस!

माझ्या पिढीतील अनेकांना पूजनीय गुरुजी यांना प्रत्यक्ष बघितलेले स्मरत नाही. पण ज्यांनी आम्हाला कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणून घडवले, त्या सर्वांच्या तोंडून पूजनीय गुरुजी आम्ही अनुभवले आहेत. जाणत्या वयात एकदा तरी, पूजनीय गुरुजी आम्हाला भेटायला हवे होते.


समर्पणशीलता

पूजनीय गुरुजींचे जेव्हा आपण स्मरण करतो, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आत्यंतिक देवदुर्लभ गुणांचा त्यांच्याकडे असलेला समुच्चय. त्या सर्वांचे समाजाप्रति, राष्ट्राप्रति, आपण अंगीकारलेल्या ध्येयाप्रति समर्पण.

पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी, अत्यंत विश्वासाने त्यांच्यावर सोपविलेली संघटनेची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे आयुष्यभर वहन केली, त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचे हे समर्पण. त्यांची स्मरणशक्ती, त्यांची विद्वत्ता, त्यांची नम्रता, त्यांचा साधेपणा, सहज व्यवहार समोरच्याला जिंकून घेतल्याशिवाय राहात नव्हता.
 
 
सरसंघचालकपदाची धुरा

संघ स्थापन होऊन जेमतेम 15 वर्षे झाली होती. डॉ. हेडगेवार यांनी, ‘याचि देही याचि डोळा’ ध्येय साकार करण्यासाठी केलेला पण!

त्यात खालावत गेलेली त्यांची प्रकृती, त्यांचे निधन आणि केवळ 34व्या वर्षी, गुरुजींवर सरसंघचालक अशी जबाबदारी येऊन पडली. डॉ. हेडगेवार यांनी सुरुवातीच्या काळात गोळा केलेले बाल,अरुण आता वयाच्या पंचविशीत आले होते. डॉक्टर त्यांचे सर्वस्व होते. त्यांचे जाणे हा त्या सर्वांना मोठा मानसिक धक्का होता. पूजनीय गुरुजी यांना सरसंघचालक म्हणून या सर्व कार्यकर्त्यांनी सहज स्वीकारणे, हे केवळ पूजनीय गुरुजी यांच्या निरपेक्ष प्रेमानेच शक्य झाले. ज्याचे वर्णन संघगीतात ‘शुद्ध आणि सात्विक प्रेम’ असा नेहमी आला आहे.


अलौकिक प्रतिभा


देशामध्येही प्रचंड अस्वस्थता होती. स्वातंत्र्याची चळवळ कळसावर पोहोचली होती. त्याच वेळेस पाकिस्तानची मागणी जोर धरत होती. एकीकडे हिंदूहिताचा बळी देऊ पाहणारे काँग्रेसचे नेतृत्व आणि दुसरीकडे, आक्रमक मुस्लीम समाजाकडून होणारे अत्याचार या दुहेरी कात्रीत सापडलेल्या हिंदू समाजाला, धीरोदात्तपणे मार्गदर्शन करण्याची गरज होती. संघटन आणि समाज दोघांना सावरण्याची ती वेळ होती. पूजनीय गुरुजी यांची मोठी अग्निपरीक्षा, काळ घेऊ पाहत होता. पूजनीय गुरुजी यांचे नेतृत्व यातून तावून सुलाखून बाहेर पडले. पूजनीय गुरुजींनी डॉ. हेडगेवार यांच्याप्रति असलेल्या निष्ठेतून आणि अलौकिक प्रतिभेतून, ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

संघटनेच्या दृष्टीने कार्यकर्त्याना सावरत असताना त्यांनी, पूजनीय डॉ. यांच्याबद्दल असणार्‍या अपार श्रद्धेचा आधार घेतला आणि संघ शाखेचा मंत्र, तंत्र यावर लक्ष केंद्रित करत, आपल्या चिंतनातून एक वैचारिक सामर्थ्य त्यांनी प्राप्त करून दिले. त्या काळात किमान एक वर्ष संघकार्याचा विस्तार करण्यासाठी द्या, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
 
अनेक कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय थांबवून, पूजनीय गुरुजी यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून बाहेर पडलेले अनेकजण पुढे संघकार्य करताना आजीवन प्रचारक राहिले.
 
 
 
ध्येयवाद


पूजनीय गुरुजी यांनी, फाळणीच्या पूर्वकाळात त्या भागात अत्यंत कठीण परिस्थितीत अनेक वेळा प्रवास केला. हिंदू समाजाला धीर देण्याचे कार्य केले. स्वयंसेवकांना त्या कठीण काळात, हिंदू समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. माधवराव मुळे यांची नियुक्ती पंजाबचे प्रांत प्रचारक म्हणून केली. “शेवटचा हिंदू सुरक्षित परत येत नाही, तोपर्यंत आपली जागा सोडू नका,” ही त्यांची आज्ञा, अनेक स्वयंसेवकांच्या प्राणावर बेतली.
पूजनीय गुरुजी यांनी राजा हरिसिंग यांनी काश्मीर भारतात राहावा असा निर्णय करावा, म्हणून केलेली शिष्टाई हा त्यांच्या जीवनातील आणि संघ जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणावा लागेल. दुर्दैवाने संघावर, पूजनीय गुरुजी यांच्यावर बेलगाम आरोप लगावणारे, कधीच पूजनीय गुरुजी यांना याचे श्रेय देत नाहीत. अर्थात श्रेयवाद नाही, तर ध्येयवाद ही पूजनीय गुरुजी यांची शिकवण होती. त्यामुळे त्यांना याचे कधीच वैषम्य वाटले नाही.
 

धीरोदात्तपणा
 
गांधीजींच्या दुर्दैवी हत्येनंतर आलेली संघबंदी, त्यांना भोगावा लागलेला कारावास, हा त्यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या धीरोदात्तपणाची परीक्षा घेणारा होता. संपूर्ण समाजाला संघाच्या विरोधात उभे करून, एखाद्या गुन्हेगारासारखी त्यांची प्रतिमा निर्माण केली गेली. पण पूजनीय गुरुजींनी आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून, कुठलाही रोष व्यक्त केला नाही. स्वयंसेवकांना सत्याग्रहाचे आवाहन केले आणि अत्यंत शांततेने, संघावर झालेल्या अन्यायाचा लढा ते लढले. महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणवणारे जाळपोळ करत होते, हिंसा करत होते आणि ज्यांच्यावर गांधींच्या हत्येचा खोटा आरोप केला गेला होता, ते पूजनीय गुरुजी आणि त्यांचे अनुयायी स्वयंसेवक शांतपणे अन्यायाविरुद्ध अहिंसक मार्गाने लढत होते, हा एक दैवदुर्विलासच.

संघबंदी उठली. सर्वत्र गुरुजी यांचे सत्कार समारंभ झाले. त्यांनी संघाला त्यावेळी असणारी आर्थिक गरज लक्षात घेऊन, स्वतःच्या सत्काराला मान्यता दिली. पण या निमित्ताने त्यांनी सर्वत्र मार्गदर्शन करताना, स्वयंसेवकांना सकारात्मक पद्धत्तीने कार्याची गती वाढवण्याचे आवाहन केले. 1950 ते 1974 म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जपली आणि डॉ. हेडगेवार यांना अपेक्षित होती तशी विकसित करत नेली.


दूरदृष्टी
 
त्यांच्या कार्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजजीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात संघ विचाराचे, राष्ट्र विचाराचे पाऊल त्यांनी, विविध क्षेत्रांत उमटवण्यासाठी अनेक कर्तृत्ववान कार्यकर्ते, प्रचारक यांना प्रेरणा दिली.
 
‘अभाविप’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘जनसंघ’, ‘भारतीय मजदूर संघ’, ‘वनवासी कल्याण आश्रम’, ‘विद्या भारती’ या संघटनांच्या माध्यमातून, सामजिक जीवनातील सर्व क्षेत्रांत संघ विचार पोहोचला. कन्याकुमारी येथील ‘विवेकानंद केंद्र’ ही संपूर्ण हिंदू समाजाला प्रेरणा देणारी वास्तू, विचार आणि चळवळ उभी राहिली, ती पूजनीय गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली. एकनाथजी रानडे या आपल्या सर्वात ज्येष्ठ कार्यकर्त्याला, त्यांनी हे काम करण्यास संघातून मुक्त केले, त्यांची ही दूरदृष्टी होय.
 
संघाच्या कामात प्रचारक कार्यकर्ता ही महत्त्वाची व्यवस्था आहे. सुरुवातीच्या काळात पूजनीय डॉ. हेडगेवार यांची प्रेरणा घेऊन, अनेक विद्यार्थी कार्यकर्ते शिक्षणासाठी बाहेर पडले आणि त्यांनी शिक्षण घेत संघ वाढवला. पुढील काळात हे सर्वजण आणि इतर अनेक प्रचारक म्हणून, आयुष्यभर कार्यरत राहिले. या व्यवस्थेला योग्य दिशा देऊन, ती एक कायमस्वरूपी व्यवस्था उभी राहिली. त्यात पूजनीय गुरुजी यांचे चिंतन आणि मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. त्यांच्या प्रेरणेने प्रचारक कार्यकर्त्यांची देशभर अशी फळी उभी राहिली, की आज जो राष्ट्रजीवनात बदल दिसत आहे, त्यामागे ही सगळी खपलेली प्रचारक मंडळी आहेत.

 
द्रष्टेपण

भाषावार प्रांतरचना हा देशाच्या एकात्मतेवर परिणाम करू शकतो, हे गुरुजींनी म्हटले होते आणि ते दुर्दैवाने खरे ठरले. सीमेवर कुंपण घातले पाहिजे, ही त्यांची आग्रही मागणी होती. देशामध्ये घुसखोरीचा पसरलेला रोग बघितल्यावर, ती मागणी किती रास्त होती हे समजते. जेव्हा ’हिंदी चिनी भाई भाई’ नारे लगावले जात होते, तेव्हा चीनकडून आपल्याला खरा धोका आहे, हे पूजनीय गुरुजी वारंवार सांगत होते. चीन आपला मूळ साम्राज्यवादी आणि विस्तारवादी चेहरा घेऊन जगासमोर एक दिवस येईल, हा त्यांचा निष्कर्ष होता आणि आज सार्‍या जगाला हे पटले आहे. पूजनीय गुरुजी यांचे हे द्रष्टेपण होते.

देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात सर्वात जास्त तिरस्कार ज्यांनी पचवला आणि सर्वात जास्त अमृताचा वर्षाव समाजावर आपल्या स्नेहल स्वभावाने ज्यांनी केला, ते पूजनीय गुरुजी होते. आज ‘आत्मनिर्भर भारता’चा जो विचार सर्वत्र दिसत आहे, त्याचा वैचारिक पाया पूजनीय गुरुजी यांच्या चिंतनातून आला आहे आणि आपली विश्वगुरुत्वाची संकल्पना ही सुद्धा पूजनीय गुरुजी यांच्याच विचारधारेतच आहे.
 
आत्मविलोपी
 
आध्यात्मिक क्षेत्रात उंची गाठूनही पूजनीय गुरुजी आत्मविलोपी वृत्तीचा वस्तुपाठ होते.
शत नमन माधव चरण मे, शत नमन माधव चरण मे!



रविंद्र मुळे
9422221570
Powered By Sangraha 9.0