अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या 'या' नव्या चित्रपटाची घोषणा; लग्नानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर!
24 Feb 2025 16:54:51
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेता पृथ्वीक प्रताप लवकरच नव्या चित्रपटात झळकणार आहे. विनोदी आणि अतरंगी भूमिकांसाठी ओळखला जाणारा पृथ्वीक आता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी पृथ्वीकने प्राजक्ता वायकूळसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. चार महिन्यांनंतरच तो नव्या चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच त्याने या चित्रपटातील लूकचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं असून, "एकतर प्रचंड प्रेम नाहीतर डारेक्ट गेम... अशा स्वभावाचा आपला जिगरी यार रवी," असं कॅप्शन दिलं आहे.
पुष्कर जोग लिखित आणि दिग्दर्शित ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटात पृथ्वीक मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पुष्कर जोग, विशाखा सुभेदार आणि अन्य कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाच्या पोस्टरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पृथ्वीकला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.