नवी दिल्ली: देशभरातील शेतकर्यांना पीएम किसान योजनेचे १८ हप्ते मिळाले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९व्या हप्त्याचे वितरण आज सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. ‘पीएम किसान सन्मान निधी’च्या वितरणाचा कार्यक्रम बिहारमध्ये पार पडणार आहे.
भागलपूर या ठिकाणी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ‘पीएम किसान सन्मान निधी योजने’च्या १९व्या हप्त्याचे वितरण मोदी यांच्या हस्ते होईल. देशभरातील ९.८ कोटींहून अधिक शेतकर्यांना २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा थेट हस्तांतरण केले जाणार आहे. बिहारमध्ये पार पडणार्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नागपूर येथून सहभागी होणार आहेत. ‘पीएम किसान योजनें’तर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकर्याला सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ शेतकर्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जातो. शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात.