स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही!

22 Feb 2025 16:42:35

mla suresh dhas on santosh deshmukh murder case
 
 
बीड : (Suresh Dhas) आमदार सुरेश धस यांनी शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी बीड येथील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. याचदरम्यान सुरेश धस यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. मस्साजोग ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
नेमकी काय आहे पोस्ट?
 
"मध्यंतरी माझ्याबाबतीत संभ्रम निर्माण होईल, माझ्या हेतूवर शंका निर्माण होईल, स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मी काहीतरी सेटलमेंट करतोय अश्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचा, खोटा व चुकीचा प्रचार करण्याचा प्रयत्न काही जणांनी मीडियाला हाताशी धरून केला. पण, मी सांगू इच्छितो मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला निर्णायक वळणावर नेण्यापर्यंत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजवरची माझी भूमिका सर्वांनी पाहिली आहे. माझा हेतू स्पष्ट आहे. माझी भूमिका ठाम आहे. स्व. संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याच्या माझ्या प्रयत्नात व हेतूत या खोट्या बातम्या आणि खोट्या प्रचाराने तसूभरही फरक पडणार नाही. आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि या प्रकरणातील सद्यस्थितीबाबत चर्चा केली आहे. देशमुख कुटुंबियांना पूर्णपणे न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील."
 
 
बीड येथील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला २ महिने उलटून गेले तरीही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. तसेच ताब्यात असलेल्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर न्यायाची मागणी करत मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0