'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट'मध्ये सिंधुदुर्गचा डंका; 'या' दोन पक्ष्यांची जिल्ह्यातून प्रथमच नोंद

20 Feb 2025 11:10:48
sindhudurg birders recorded highest species in great backyard bird count


मुंबई (अक्षय मांडवकर) -
आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट' या पक्षी निरीक्षण मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे (sindhudurg birders). १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या या पक्षी निरीक्षणामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक पक्षी प्रजातींची नोंद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे (sindhudurg birders). जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षकांनी अत्यंत मेहनतीने या मोहिमेसाठी पक्षी निरीक्षण करुन मलिन बदक आणि लांब चोचीच्या तिरचिमणीची जिल्ह्यातून प्रथमच नोंद केली आहे. (sindhudurg birders)
 
 
'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट' हा पक्षीशास्त्रातील सामुदायिक विज्ञान म्हणजेच 'सिटिझन सायन्स'वर आधारित एक प्रकल्प आहे. यामध्ये पक्षी निरीक्षणाचे काम केले जाते. निरीक्षणाची ही मोहिम दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्यात आयोजित केली जाते. या कार्यक्रमाला यंदा 'कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी' आणि 'नॅशनल ऑड्युबॉन सोसायटी'चे पाठबळ मिळाले आहे. या मोहिमेत पक्षीनिरीक्षक हे आपल्या आसपास फिरुन केलेल्या पक्ष्यांच्या नोंदी 'ई-बर्ड' या संकेतस्थळवर नोंदवतात. यंदा या मोहिमेमध्ये महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षकांनी १४ ते १७ फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये पक्ष्यांच्या २८९ प्रजातींची नोंद केली आहे. त्याखालोखाल पुणे (२८४), रायगड (२४१), अमरावती (२३३), मुंबई (२०३) आणि अहमदनगर (२०१) या जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे.
 
 
पक्षी निरीक्षणाच्या या मोहिमेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ पक्षी निरीक्षकांनी पायपीट केली. त्यामध्ये दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वाॅरियर्स' पुरस्कारामध्ये 'यंग नॅचरलिस्ट' श्रेणीचे पुरस्कार प्राप्त विजेते प्रवीण सातोसकर यांनी सर्वाधिक प्रजाती नोंदवल्या. या पक्षीनिरीक्षकांनी जिल्ह्यातील एकूण २३ जागांवर पक्षीनिरीक्षण केले. त्यामाध्यमातून मलिन बदक आणि लांब चोचीच्या तिरचिमणीची जिल्ह्यातून प्रथमच नोंद करण्यात आली. पक्षीनिरीक्षक सचिन प्रभू यांना मालिन बदक हे पाट तलावामध्ये आणि लांब चोचीची तिरचिमणी ही चिप्पी विमानतळावर आढळून आली.
 
 
 
'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट'या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला अव्वल ठरवण्यासाठी जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली. आम्ही तिलारी, तळकट, धामापूर तलाव, मोती तलाव, चिप्पी विमानतळ मिळून २३ महत्त्वाच्या जागी पक्षीनिरीक्षण केले. त्यामुळेच आम्हाला पक्ष्यांच्या इतक्या प्रजातींची नोंद करणे शक्य झाले. - प्रवीण सातोसकर, पक्षीनिरीक्षक
Powered By Sangraha 9.0