मृत्यूकुंभ म्हणणाऱ्या ममतादीदींवर संत-महंतांचा घणाघात!

20 Feb 2025 17:30:50

Sant Mahant Comment on Mamata Banerjee

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभला ‘मृत्यूकुंभ’ म्हणून संबोधल्याने संत समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून अनेक तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. (Sant Mahant Comment on Mamata Banerjee) ममतादीदींचे विधान सनातन धर्म आणि महाकुंभाच्या पावित्र्याचा अपमान असल्याचे संतांनी म्हटले आहे. महाकुंभ हा केवळ कार्यक्रम नसून तो सनातन संस्कृतीचा आत्मा आहे, त्यामुळे ममता बॅनर्जींनी जाहीर माफी मागावी अशी मागणी संतांनी केली आहे.

श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीचे राष्ट्रीय सचिव महंत जमुना पुरी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या जबाबदार पदावरून असे वक्तव्य करणे योग्य नाही. प्रयागराज महाकुंभ हा अमृत महोत्सव आहे, ज्याची दिव्यता आणि भव्यता संपूर्ण जगाने पाहिलीय. ममता बॅनर्जी यांनी महाकुंभाच्या नावावर असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत.

हे वाचलंत का? : महाराणा प्रताप यांचा पुतळा ठरलेल्या जागेवरच उभारणार

पंच दशनम आवाहन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुण गिरी महाराज ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत म्हणाले, पश्चिम बंगाल हे हिंदू सनातन्यांसाठी मरणासन्न राज्य बनत आहे. हजारो सनातन्यांची कत्तल केली जात आहे आणि लाखो हिंदूंना निवडणुकीच्या वेळी स्थलांतरित व्हावे लागले आहे. निर्मोही अनी आखाड्याचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास यांनी ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य म्हणजे सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "प्रयागराज महाकुंभाने सनातनचे देवत्व शीर्षस्थानी प्रस्थापित केले आहे. ममता बॅनर्जी महाकुंभाचा न्याय करू शकत नाहीत कारण त्यांनी नेहमीच सनातन आणि त्याच्या प्रतीकांचा अपमान केला आहे. अशी विधाने करून त्या अरविंद केजरीवाल यांच्या मार्गावर चालत आहेत आणि त्यांनाही असेच नशीब भोगावे लागेल."
 
महामंडलेश्वर ईश्वरदास महाराज म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावरून त्यांची सनातन धर्माविरुद्धची मानसिकता दिसून येते. ममता बॅनर्जी नेहमीच सनातनला विरोध करत आहेत. त्यांना बंगालला दुसरा बांगलादेश बनवायचा आहे. अयोध्या हनुमान गढी मंदिराचे महंत राजू दास यांनी ममता बॅनर्जींचे वक्तव्य दुर्दैवी म्हटले आहे. ममता बॅनर्जींनी आपल्या शब्दाबद्दल माफी मागावी, असे ते म्हणाले. तसेच अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले, संत समाज ममता बॅनर्जी यांच्या विधानाचा तीव्र निषेध करतो. महाकुंभ हे सनातन संस्कृती आणि भक्तीचे प्रतीक आहे."

गोवर्धन मठ पुरीचे स्वामी अधोक्षजानंद देव तीर्थ म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी स्वतः प्रयागराज महाकुंभला यावे आणि त्याचे निरीक्षण करावे. ज्या अमृत कुंभमध्ये ५० कोटींहून अधिक सनातन्यांनी पुण्य संपादन केले आणि दैवी अनुभव घेतला, त्याला मृत्यूचा कुंभ म्हणणे अत्यंत निंदनीय आहे. राजकारण्यांनी धार्मिक विषयांवर भाष्य न केल्यास बरे होईल.

Powered By Sangraha 9.0