नाशिक : कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, आता नाशिक जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. यानुसार, नाशिक जिल्हा न्यायालयाने कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
"गेल्या ३० वर्षांपूर्वी हा खटला दाखल झाला असून ही राजकीय केस होती. त्यावेळी तुकाराम दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरत्वापोटी सरकारला सांगून त्यांनी ही केस केली होती. आज पहिल्यांदा या केसचा निकाल लागलाय. ४० पानांचे निकालपत्र आहे. मी अजून हे निकालपत्र वाचलेले नाही. या प्रकरणात मी कायद्यानुसार जे करता येईल ते सगळे करणार असून मी हायकोर्टात न्याय मागणार आहे," असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.