गुजरातमध्ये तयार होतोय उन्नत पॉडकार प्रकल्प

19 Feb 2025 12:32:03

podtaxy


वडोदरा, दि.१९: वृत्तसंस्था 
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात 'उन्नत पॉडकार' वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये "स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली" प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहणी करण्यासाठी तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील दाट लोकसंख्या असणाऱ्या शहरात उभारण्यासाठी चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.
 
नुट्रान ईव्ही मोबिलिटी आधारित "उन्नत पॉडकार" वाहतूक व्यवस्था ही पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे. जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर धावतात. ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडमध्ये किमान २० प्रवासी बसू शकतात. ६० ते ७० किमी प्रति तास या वेगाने हे पॉड धावतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टम वर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात. मंत्री सरनाईक यांनी 'उन्नत पॉड' वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथील "उन्नत पॉडकार" वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असे प्रतिपादन केले.
Powered By Sangraha 9.0