शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करणे योग्य

19 Feb 2025 11:25:21

chhatrapati shivaji maharaj
 
शासकीय निर्णयानुसार आता दरवर्षी शिवजयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी होते. तत्पूर्वी लोक निरनिराळ्या तिथीला शिवजयंती साजरी करायचे. यातील विस्कळीतपणा कमी व्हावा, म्हणून शासनाने समिती नेमून यात एकवाक्यता आणली. त्यासाठी आधी तिथी निश्चित करणे भाग होते. समकालीन कागदपत्रांत परमानंद कविकृत ‘शिवभारत’ हे जास्त विश्वासार्ह मानले पाहिजे. कारण, शिवछत्रपती जिवंत असतानाच हे लिहिले गेले होते. त्यात ’फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१’ हा उल्लेख स्पष्ट आहे. त्यात शिवाजी महाराज यांची जन्मकुंडली उपलब्ध आहे. इतरही काही कागदपत्रे पाहून ’फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१’ ही तिथी निश्चित केली गेली. मग त्या दिवशी कोणती इंग्रजी तारीख असेल, हे निश्चित केले गेले. ती तारीख होती दि. १९ फेब्रुवारी १६३०. हे सगळे सरकारी पद्धतीने तज्ज्ञ माणसे नेमून ठरविले गेले. पण, हे ठरविताना एक घोटाळा झाला. तारीख ठरविताना जुनी ज्युलियन इंग्रजी कालगणना प्रमाण धरण्यात आली.
 
खरे म्हणजे, ही कालगणना शिवजन्माआधीपासूनच कालबाह्य झाली होती. इतरत्र नवीन सुधारित कालगणनेचा वापर सुरू झाला होता. पण, इंग्लंडमधील ब्रिटिश सरकारने ती त्यावेळी स्वीकारली नव्हती. आपण ब्रिटिश राज्यात असल्याने आपणाकडील इंग्रज प्रतिनिधीने या जुन्या पद्धतीने ही तारीख ठरविली. जुन्या आणि नवीन सुधारित कालगणनेत सुमारे दहा दिवसांची तफावत आहे. पण, नंतर जुनी कालगणना कालबाह्य झाल्यामुळे इंग्रज लोकांनीच सुधारित ग्रेगरियन कालगणना वापरणे सुरू केले. सुधारित कालगणनेनुसार शिवजयंतीची तारीख येते दि. १ मार्च १६३०. म्हणून दि. १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख चुकीची आहे, हे सिद्ध होते. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, जी कालगणना अस्तित्वातच नाही आणि इंग्रज लोकही ती आता मानत नाहीत, ती प्रमाण मानून दि. १९ फेब्रुवारी ही तारीख ठरविणे कितपत योग्य आहे?
 
पण, मुळात प्रश्न हा आहे की, तिथी निश्चित केली ना, मग इंग्रजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करायचा हट्ट का? समकालीन संत तुकाराम, संत रामदास यांचे स्मरण दिवस आपण तिथीप्रमाणेच साजरे करतो ना. मग शिवछत्रपती यांचा जन्मदिवस तिथीप्रमाणे का साजरा करू नये? इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या तारखा ठरविल्या, तरी उर्वरित भारतात हिंदू सण-उत्सव हे भारतीय पंचांगतिथीनुसार मानले जात होते. तेथे काही अडचण आली नाही. मग शिवजयंतीसारखा भारतीय सण परक्या इंग्रजी तारखेप्रमाणे आणि तीसुद्धा चुकीची साजरा करणे कितपत योग्य आहे? प्रसिद्ध इतिहास लेखक मल्हार कृष्ण गोखले यांनी हा मुद्दा पूर्वी एकदा पुढे आणला होता. दि. १९ फेब्रुवारी ही तारीख कशी अशास्त्रीय आहे आणि शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करणे कसे योग्य आहे, हे त्यांनी एका लेखात विशद केले होते. राज ठाकरे हेसुद्धा शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करावी, यासाठी आग्रही होते. पण, पुढे इतर राजकारणात या मागणीचा पाठपुरावा झाला नाही.
 
यानिमित्ताने माझी शासनाला अशी विनंती आहे की, हा शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याचा मुद्दा मंत्रिमंडळात तातडीने चर्चेला घ्यावा आणि या वर्षापासून फाल्गुन वद्य तृतीयेला (यावर्षी ती दि. १७ मार्च रोजी आहे.) शिवजयंती साजरी होईल, असा अध्यादेश काढावा. आणखी एक विनंती आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून ‘परमानंदकृत शिवभारत’ या ग्रंथाची नवीन स्वस्त आवृत्ती काढावी. यासंबंधात कोणाचा विरोध असणार नाही, असे वाटते. नवीन सरकारचा एक लोकप्रिय निर्णय म्हणून जनसामान्य आनंदित होतील.
 
गजानन गोसावी
 
Powered By Sangraha 9.0