डॉ. शुभदा जोशी हे एक ज्ञानमार्गी व्यक्तिमत्त्व. विद्यार्थी असताना, अध्ययन-अध्यापन करताना ज्ञानमार्गी असणे, ही स्वाभाविक बाब समजली पाहिजे. पण, त्या सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानसाधनेत मग्न असतात, हे त्यांचे वेगळेपण. ‘नागरी अभिवादन न्यास’ या ४७ स्वयंसेवी संस्थांच्यावतीने, नुकताच त्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
सेवानिवृत्तीनंतरही सतत अध्ययन, चिंतन, मनन आणि त्यावर आधारित संदर्भ प्रबंधलेखन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांत व परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करणे, व्याख्यानांसाठीचा प्रवास या डॉ. शुभदा जोशी यांच्या ज्ञानदानाच्या कार्यात अद्यापही खंड पडलेला नाही. ‘डॉक्टरेट’च्या प्रबंधाव्यतिरिक्त अनेक ग्रंथांचे लेखन व संपादन करण्यात त्या आजही मग्न असतात. मेधावी वक्तृत्व व वादविवाद कौशल्य यांची देणगी त्यांना उपजत लाभली व त्यांनी ती अभ्यासातून विकसितही केली. कोणत्याही विषयाची संशोधनावर आधारित तर्काधिष्ठित व बुद्धिनिष्ठ मांडणी, हे त्यांच्या मांडणीचे वैशिष्ट्य. त्यांच्या लेखनाचा भर आशयावर असतो. त्यामुळे त्यांच्या लेखनाला शिस्त असते व चिरेबंदपणाही असतो. त्यांच्या विचारप्रक्रियेत व मांडणीत झापडबंदपणा नसतो. म्हणूनच विविध धर्मांच्या विचारप्रवाहांचा स्वागतशील मनाने अभ्यास करून, त्यातील सत्वाची त्या मांडणी करू शकतात. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सत्कार डोंबिवली येथील ‘नागरी अभिवादन न्यास’ या ४७ स्वयंसेवी संस्थांच्यावतीने, दि. १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘ज्ञानमार्गा’वरील वाटचालीचा व कर्तृत्वाचा परिचय करून देणे, हा या लेखाचा उद्देश आहे.
शशिकला जोशी व अरविंद जोशी यांची ज्येष्ठ कन्या म्हणजे डॉ. शुभदा जोशी. शशिकला या ‘राष्ट्र सेविका समिती’च्या एकनिष्ठ कार्यकर्त्या, तर वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. शुभदांचा जन्म मिरजमधील उद्गीर येथे दि. १७ एप्रिल १९५४ रोजी झाला. त्या पाच वर्षांच्या असतानाच जोशी कुटुंब डोंबिवलीस स्थायिक झाले. त्या पाचवीत असताना, ‘राष्ट्र सेविका समिती’च्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर या डोंबिवली येथे रामायणावरील प्रवचनांसाठी आल्या होत्या. तेव्हा आईचे बोट धरून त्या त्यात सामील झाल्या. तेव्हापासून समितीचे संस्कार त्यांच्यावर होऊ लागले. अकरावीत असताना त्यांचे समितीतील प्रथम वर्षाचे शिक्षण मुंबई येथे झाले. दुसर्या वर्षाचे प्रशिक्षण बडोद्यात, तर तृतीय वर्ष समितीच्या प्रथेप्रमाणे नागपूर येथे झाले. या काळात त्यांच्यात वैचारिक पक्केपणा, समितीमंत्र व शाखातंत्र यांचा विकास झाला. समितीच्या अखिल भारतीय कार्यकर्त्यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. पुढे शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा समितीच्या दैनंदिन कामाशी संबंधच राहिला नसला, तरीही विविध धर्मांचा व विचारप्रवाहांचा अभ्यास होत राहिला आणि त्यांची समितीने रूजविलेली वैचारिक निष्ठा कधी पातळ झाली नाही. शिक्षण क्षेत्रात वावरताना त्यांनी जी कर्तव्यतत्परता, शिस्त व प्रामाणिकपणा दाखवत व्यवहार केला, त्यामुळे तोंडाने कधीही प्रत्यक्ष उच्चार न करताही त्या संघपरिवारातील आहेत, हे चाणाक्ष मंडळींच्या लक्षात आले. त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली.
त्यांच्या वडिलांचा शास्त्रीय उपकरणे बनविण्याचा कारखाना होता. ते अतिशय कुशल कारागीर होते. त्यांच्या कामात नेटकेपणा व सौंदर्य होते. ते लाकडाचा शास्त्रीय वजनकाटा बनवत. त्यात अचूकता होती. एखाद्या कागदाचे वजन व त्यावर शाईने सही केल्यानंतरचे वजन, यातील सूक्ष्म फरक दाखविणारी अचूकता ते दाखवू शकत असत. अशा संस्कारी वातावरणात शुभदा यांचे बालपण गेले. आपल्या मातापित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शुभदा म्हणतात, “माझ्या बाबांचा हात वस्तू घडविणारा होता, तर आईचा हात माणूस घडविणारा होता.” त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणत्या कुशीत घडले हे कळावे, म्हणून तपशील विस्ताराने सांगितले. शुभदा यांचे शालेय शिक्षण, डोंबिवली येथील टिळकनगर विद्या मंदिर येथे झाले. तेथे त्यांचे वक्तृत्व फुलायला सुरुवात झाली. एक बुद्धिमान विद्यार्थिनी म्हणून त्या नावारूपाला आल्या. योगायोग असा की, सेवानिवृत्तीनंतर ती शाळा ज्या ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’तर्फे चालविले जाते, त्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. ज्या संस्थेत आपण शिकलो, त्या शाळेच्या संस्थेत अध्यक्षपदाचा मान मिळणे, ही किती दुर्मीळ व गौरवाची बाब आहे!
एसएससीच्या उज्ज्वल यशानंतर त्यांनी मुंबईच्या रुईया या ख्यातनाम महाविद्यालयात प्रवेश घेतला, तो ही कलाशाखेत. तेथे त्यांना एक मोकळे आकाशच मिळाले. येथे त्यांना प्रा. सरोजिनी वैद्य, प्रा. वसंत बापट, प्रा. सदानंद रेगे, प्रा. प्र. ना. परांजपे यांच्यासारखे ख्यातनाम शिक्षक मिळाले. येथील समृद्ध ग्रंथालयाने त्यांना, ज्ञानाचे नवे दालन करून दिले. त्यांच्या वक्तृत्वाला व वादविवाद कौशल्याला नवा अवकाश मिळाला. अनेकानेक स्पर्धांत रुईयाचे प्रतिनिधित्त्व करून पदके, पारितोषिके व पुरस्कार मिळविले. येथील ग्रंथालयात ‘समाजप्रबोधन’ पत्रिका, ‘साधना’ व ‘नवभारत’ या वेगळ्या विचारसरणीच्या नियतकालिकांशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. त्या बीएला विद्यापीठात सर्वप्रथम आल्या. एमएच्या दुसर्या वर्षाला असताना, रुईयाच्या प्राचार्यांनी त्यांना अर्धवेळ प्राध्यापिकेचे निमंत्रण दिले. स्वाभाविकपणे एम.ए. झाल्यानंतर त्याच महाविद्यालयात त्यांना रितसर पूर्णवेळ नोकरी मिळाली. तेथूनच त्यांनी ‘पीएच.डी’चा अभ्यास पूर्ण केला. मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात प्रवेश मिळविण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याने, त्यांचे क्षितिज अधिकच रुंदावले. त्यांच्या रुईयातील या देदीप्यमान कारकिर्दीची दखल घेऊन, रुईया महाविद्यालयाच्या ‘माजी विद्यार्थी संघा’तर्फे दिला जाणारा ‘ज्वेल ऑफ रुईया’ हा किताब त्यांना मिळाला. ज्यांनी आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे, अशांना हा पुरस्कार दिला जातो. १९६९ ते १९८६ सालच्या या १७ वर्षांच्या काळात विद्यार्थिनी, प्राध्यापिका व संशोधक अशा विविध नावांनी वावर असलेल्या शुभदा यांनी या काळचे सोने केले.
‘पीएच.डी’ करण्यासाठी रुईयाचे प्राचार्य आर. ए. कुलकर्णी यांनी त्यांना रुपारेलचे प्राचार्य डॉ. मुद्गल यांच्याकडे पाठवले. शुभदा यांचे झगमगते करिअर पाहून त्यांनी, शुभदांना मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. डॉ. मुद्गलांनी त्यांना देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचा जाडजूड ग्रंथ ‘लोकायत’ दिला. ‘हा पूर्वपक्ष आहे. याचा उत्तरपक्ष तुम्ही संशोधनाधारे करावा,’ असा आव्हानात्मक विषय दिला. ‘लोकायत दर्शन’ म्हणजे, भौतिक नास्तिकतावादाची विचारधारा. इतिहासाची मार्क्सवादी दृष्टिकोनातून केलेली मांडणी. वेद, उपनिषदे, तंत्र व सांख्यदर्शनाची साम्यवादाच्या प्रभावाखाली केलेली मांडणी. या प्रबंधाचे खंडन करणारा, ‘लोकायत-अ क्रिटिकल स्टडी’ हा प्रबंध शुभदा यांनी तयार केला. त्यात त्यांनी अस्सल भारतीय दृष्टिकोनातून, आद्य शंकराचार्य ते योगी अरविंद यांनी वेद, उपनिषदे व भारतीय दर्शन यांची जी मांडणी व मीमांसा केली आहे, याचा आधार घेतला. सांख्यकारिकांचा अभ्यास करून, सांख्य तत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी केली. त्यासाठी त्यांनी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, पं. सातवळेकर व बाळशास्त्री हरदास यांच्या ग्रंथांचा संदर्भ म्हणून अभ्यास केला व आपला उत्तरपक्ष मांडला. त्यांचा प्रबंध स्वाभाविकपणेच त्या विषयात मैलाचा दगड ठरला.
सन १९८६ ते २०१६ अशी ३० वर्षे त्या मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात, प्रथम प्राध्यापिका व नंतर विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर ‘तत्त्वज्ञान’ या विषयाचा अभ्यास करताना त्यांच्या असे लक्षात आले की, या सर्व अभ्यासक्रमात पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला खूपच झुकते माप दिलेले आहे आणि भारतीय दर्शनाला नगण्य स्थान दिलेले आहे. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर ४० वर्षे उलटून गेल्यानंतरही, इंग्रजी भाषेतून दिले जाणारे पाश्चात्य विद्यांचे शिक्षण या मेकॉलेप्रणित प्रभावातून, आपले शैक्षणिक धोरण बाहेर पडले नव्हते. म्हणून शुभदा यांनी प्रथम अभ्यासक्रमात क्रांतिकारी बदल सुचविण्याचा धाडसी निर्णय घेतला. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे महत्त्व त्यांनी नाकारले नाही. पण, भारतीय तत्त्वज्ञानाचे, दर्शनाचे दुय्यम, नगण्य स्थानही स्वीकारले नाही. एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्यांनी सक्तीच्या चार अभ्यासांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. १) समकालीन भारतीय तत्त्वज्ञान २) समकालीन पाश्चात्य तत्त्वज्ञान ३) नैतिक विचारांचे तत्त्वज्ञान-भारतीय व पाश्चात्य ४) चैतन्याचे तत्त्वज्ञान (philosophy of Consciousness) .भारतीय व पाश्चात्य. ऐच्छिक विषयात - १) बुद्धिस्ट फिलोसॉफी व विपश्यना २) योगशास्त्र आणि तत्त्वज्ञान ३) भारतीय सौंदर्यशास्त्र ४)जैनॉलॉजी यातील प्रत्येक विषयात चार पेपर. थोडक्यात, त्यांनी ‘तत्त्वज्ञान’ या विषयाचे, भारतीयीकरण करून टाकले.
विद्यापीठाच्या विद्वत्सभेतील झारीतील शुक्राचार्यांनी याला भरपूर विरोध केला. पण, आपल्या समर्थक युक्तिवादाने शुभदा यांनी त्यांच्यावर मात केली. त्यांनी भारतीय संस्कृती व दर्शनाचे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केले. नोकरी करणार्यांसाठी ‘वीकएण्ड एम.ए कोर्स’ सुरू केला. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. तत्त्वांशी तडजोड न करता, तत्त्वज्ञान हा विषय त्यांनी व्यावहारिक पातळीवर आणून लोकप्रिय केला. त्या विद्यापीठात गेल्या, तेव्हा तत्त्वज्ञान विभागात विद्यार्थीसंख्या ५० होती. त्यांच्या निवृत्तीवेळी हीच संख्या १ हजार, ५०० पर्यंत पोहोचली होती. अथक परिश्रमाचे, कल्पकतेचे व दूरदृष्टीचे फळ नेहमी गोड असते, हेच खरे! आपल्या कार्यकाळात त्यांनी ‘अ.भा.तत्त्वज्ञान परिषदे’चे यशस्वी आयोजन केले. नागपूर येथे झालेल्या ‘मराठी तत्त्वज्ञान परिषदे’चे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले. या सर्व उपक्रमांसाठी त्यांनी विद्यापीठाला प्रचंड स्थायी निधी मिळवून दिला व तत्त्वज्ञान विभागाला स्वतःची वास्तूही. या विभागाला क्रांतिकारी वळण देऊन त्या समाधानाने निवृत्त झाल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी २५ विद्यार्थांना ‘पीएच.डी’साठी मार्गदर्शन केले. ‘विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका’ म्हणून त्यांचा लौकिक आजही कायम आहे.
निवृत्तीनंतरही त्यांचे अध्ययन व लेखन तसेच, प्रवास थांबलेला नाही. चर्चासत्रे, परिषदांतील सहभाग सुरूच आहे. हे तसे सोपे नव्हते. आपल्या कार्यकाळात व नंतर त्यांनी कांचीपीठाचे परम शंकराचार्य चंद्रशेखरजी सरस्वती, बौद्ध धर्माचे सर्वोच्च नेते दलाई लामा, ख्रिस्ती धर्माचे पोप जॉन पॉल यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यातून ‘Interfaith inter-religion dialogue’चे पर्व सुरू झाले. डॉ. अमर्त्य सेन, डॉ. भैरप्पा, अजित डोवाल यांचाही सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. अनेकदा त्यांनी भारतीय दर्शन मांडण्यासाठी विदेश प्रवासही केला आहे. हे सारे होत असताना वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात अनेक आघात सोसले. पण, त्याची सावली आपल्या अंगीकृत कार्यावर पडू दिली नाही.
दोन व्यक्तिगत उल्लेख. महात्मा फुले स्मृतिशताब्दी व डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी निमित्ताने त्यांनी तत्त्वज्ञान विभागातर्फे ‘Philosophical Legacy of M. Phule and Dr. Ambedkar’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र योजले होते. त्यात ’Caste in India’ आणि ’Annihilation of Caste’ या विषयावर निबंध वाचनाची संधी त्यांनी मला दिली होती. पुढे मी चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात प्राचार्य असताना न्या.रानडे यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने ‘फिलोसॉफिकल लेगसी ऑफ जस्टिस एम.जी.रानडे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात त्यांनी ‘न्या. रानडेयांचे धर्मचिंतन’ या विषयावर शोधनिबंध मांडला होता. आजही मी कोणत्याही लेखनाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला, तरी त्या मला निराश करत नाहीत. नंदिनी पित्रे यांनी लिहिलेले त्यांचे ‘शुभपर्व’ हे चरित्र नुकतेच रा.स्व.संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते व डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध झाले. त्यावेळी केलेल्या भाषणात भैय्याजींनी दोन अपेक्षा व्यक्त केल्या, “शुभदा यांनी आपले आत्मचरित्र लिहावे. २१व्या शतकाच्या परिप्रेक्ष्यात भारतीय चिंतनाची हिंदुत्वाची त्यांनी युगानुकुल पुनर्मांडणी करावी.” प्रा. डॉ. शुभदा जोशी त्यांना निराश करणार नाहीत, ही अपेक्षा. त्यांच्या सत्कारानिमित्ताने त्यांना पुनश्च शुभेच्छा!