महाकुंभाला राजकीय झालर लावणाऱ्यांवर कडाडले आचार्य प्रमोद कृष्णन
19 Feb 2025 13:50:50
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Acharya Pramod Krishnam ) प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभाकडे विश्वस्तरातून आलेल्या भाविकांचा आध्यात्मिक उत्सव म्हणून पाहिलं जातंय. मात्र काही विरोधी राजकीय पक्ष यास राजकारणाची झालर लावत महाकुंभावर टिकाटिपण्णी करताना दिसतायत आणि महाकुंभात स्नान करत पाप धुण्याचेही नाटक करतायत. आचार्य प्रमोद कृष्णम समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत, त्यांना सनातन विरोधी टोळीचे सदस्य म्हटलंय. या नेत्यांनी कायम सनातन धर्माला दुखावले आणि नंतर त्याच भावनेने महाकुंभात डुबकी मारली; असा घणाघात आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.
राजकीय संधीसाधूपणा असा उल्लेख करत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी अखिलेश यादव यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, आजकाल जो सनातनला शिव्या देतो तो अखिलेश यादवचा मित्र बनतो. अखिलेश यादव आणि राहुल गांधी या दोघांचाही सध्या एकच छंद झाला आहे. सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देणे, सुरु होतं." नरेंद्र मोदी हे सनातनचे ध्वजवाहक आहेत तर योगी आदित्यनाथ हे सनातनचा उगवता सूर्य आहे, असे म्हणत त्यांनी अखिलेश यादवना सुनावले आहे.
महाकुंभला बदनाम करण्याचे राजकारण बंद करा, असा इशारा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना दिला. ते म्हणाले की, जे महाकुंभला गलिच्छ म्हणत होते तेही तिथे डुबकी मारत आहेत. हे कसले दुटप्पी राजकारण? महाकुंभ हा श्रद्धेचा संगम आहे, त्याला राजकीय पक्षांच्या कारस्थानांचा आखाडा बनवू नका.