राजयोगिनी, कर्मयोगिनी, जय जयतु अहिल्यामाता...

19 Feb 2025 11:50:21

punyashlok ahilya devi holkar
 
मुंबई विद्यापीठाच्या बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी समारंभाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात ‘अहिल्यादेवी होळकर : एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने परिसंवादातील विचारमंथन मांडणारा हा लेख...
 
आदर्श नेतृत्व, सुशासन आणि लोककल्याणकारी राज्यकारभार याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी समारंभाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात ‘अहिल्यादेवी होळकर : एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि ‘पद्मभूषण’ सन्मानित सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, “प्रशासनात न्याय, पारदर्शकता आणि धार्मिक सहिष्णुता यांना विशेष महत्त्व देऊन आदर्शवत जीवन जगणार्‍या अहिल्यामातेची पुण्याई आणि कार्ये अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असून त्यांच्या चरित्र अभ्यासावरून सर्वांनी प्रेरणा घ्यावी. मी स्वतः माझ्या आयुष्यात आदर्शवत जीवन जगण्यासाठी, मातृत्वासाठी जिजामाता, नेतृत्वासाठी झाशीची राणी आणि कर्तृत्वासाठी अहिल्यादेवी होळकर यांना आदर्श मानले. त्या आदर्शानुसारच वाटचाल केली. अहिल्यादेवींच्या प्रशासनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकताना त्यांनी उभारलेली टपालव्यवस्था यासह त्यांनी मंदिरे, धर्मशाळा, पाणीपुरवठा योजना आणि रस्ते उभारणीसह अनेक लोकहितवादी उपक्रम राबवले,” असे त्यांनी यावेळी सांगितले. “अहिल्यामातेच्या ऋणानुबंधातून प्रत्येक इंदोरवासीयांना आपलेपणा वाटत असल्याने स्वच्छ शहरांच्या यादीत हे शहर पहिल्या क्रमांकाच्या स्थानी आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी होते.
 
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या भाषाणातील प्रमुख मुद्दे
 
  • सुशासन आणि न्यायप्रिय प्रशासन-अहिल्यादेवींनी लोककल्याणकारी धोरणांचा अवलंब करून राज्यकारभार केला. त्यांच्या निर्णय प्रक्रियेत न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता यांना महत्त्व होते. त्यांनी शेतकर्‍यांसाठी करप्रणाली सुलभ केली आणि सामाजिक सुरक्षा उपाय योजले.
 
  • महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणा - कुलगुरूंनी स्पष्ट केले की, अहिल्यादेवींनी महिलांना शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्यांनी विधवांसाठी पुनर्विवाहाची संधी निर्माण केली आणि महिलांना समाजात समान स्थान मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले.
 
  • धार्मिक सहिष्णुता आणि समाज एकता-अहिल्यादेवी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला आणि काशी, प्रयाग, सोमनाथ, रामेश्वर आणि मदुराईसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये मंदिरे उभारली व जीर्णोद्धार केला. त्यांच्या राज्यात कोणत्याही धर्मावर अन्याय झाला नाही.
 
  • आर्थिक आणि व्यापारवृद्धी धोरणे-अहिल्यादेवींनी स्थानिक उद्योग आणि व्यापाराला चालना दिली. त्यांनी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन दिले आणि स्थानिक बाजारपेठा विकसित केल्या.
 
  • नगर विकास आणि पायाभूत सुविधा-कुलगुरूंनी सांगितले की, अहिल्यादेवींनी रस्ते, पाणीपुरवठा योजना, धर्मशाळा आणि शिक्षणसंस्था स्थापन करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.
 
  • सांस्कृतिक वारसा आणि शिक्षण-अहिल्यादेवींनी संस्कृती आणि शिक्षणाला महत्त्व देत विद्वानांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या आश्रयामुळे अनेक पंडित आणि कलाकारांना संधी मिळाली.
 
  • आजच्या काळातील संदर्भ-कुलगुरूंनी नमूद केले की, आजच्या प्रशासन व्यवस्थेत आणि सार्वजनिक जीवनात अहिल्यादेवींच्या तत्त्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यांच्या न्यायप्रियतेचे आणि समावेशकतेचे तत्त्व आजच्या समाजात अधिकाधिक रुजवण्याची गरज आहे.
 
या राष्ट्रीय परिसंवादाच्या यशस्वी आयोजनामध्ये, दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र, मुंबई विद्यापीठाचा संचालक म्हणून विविध विषयांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी इतिहास, समाजशास्त्र, स्त्री अध्ययन आणि राजकीय विचारसरणी यासंबंधी मान्यवर अभ्यासकांना परिसंवादात सहभागी करून घेतले. डॉ. भरत ठाकोर यांनी अहिल्यादेवींनी न्यायनिवाड्यात घेतलेल्या धाडसी निर्णयांवर प्रकाश टाकला, तर डॉ. नैना सहस्त्रबुद्धे यांनी त्यांचे समाजसुधारणेतील योगदानआणि स्त्री सक्षमीकरणासाठी घेतलेली भूमिका अधोरेखित केली. डॉ. साधना बलवटे यांनी अहिल्यादेवींच्या स्थापत्यशास्त्र आणि धार्मिक सहिष्णुतेवरील कार्याचा सविस्तर आढावा घेतला.डॉ. मिलिंद मराठे यांनी अहिल्यादेवींनी युद्ध आणि प्रशासनामध्ये दाखवलेल्या धैर्याचा उल्लेख करत त्यांच्या रणनीतीचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. देविदास पोटे यांनी सांगितले की, अहिल्यादेवींच्या आर्थिक धोरणांमुळे माळवा प्रदेशाचा भरभराटीकडे प्रवास झाला. योगिता साळवी यांनी अहिल्यादेवींच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या राणी चेन्नम्मापासून ते सध्याच्या नरेंद्र मोदींपर्यंतच्या नेत्यांवर कसा पडलेला आहे, त्याबद्दल सखोल विवेचन केले. त्यांच्या शिक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी केलेल्या कार्यावर भर दिला, तर डॉ. बजरंग कोरडे यांनी त्यांच्या सर्वसमावेशक धोरणांची आधुनिक संदर्भांमध्ये उपयुक्तता स्पष्ट केली. मुंबई विद्यापीठाच्या या राष्ट्रीय परिसंवादाने अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षमतेचा नव्याने आढावा घेतला. त्यांच्या न्याय, समानता, लोकहित आणि स्त्री सक्षमीकरण यांसाठी केलेल्या कार्याचा आधुनिक समाजव्यवस्थेत समावेश करण्याची गरज आहे. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकारामुळे संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचे विस्तृत आणि सखोल आकलन होण्यास मदत होईल. अहिल्यादेवींचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. त्यानुसार वाटते की
 
हे राजयोगिनी, कर्मयोगिनी,
जयतु अहिल्या माता
जय-जय तू अहिल्या माता...
 
 
डॉ. शिवाजी सरगर

 
९८६९०२८०५६
Powered By Sangraha 9.0