'कुट्या' मुळे आली मत्स्यप्रजातींवर गदा

निळ्या देवमाश्याच्या शोधात (भाग - १)

    17-Feb-2025
Total Views |

fish conservation
 
 
मासेमारीच्या निरनिराळ्या पद्धती आणि मत्स्यसंवर्धन यांचे अतूट नाते आहे. या दोघांमधील सहसंबंध काही वेळा हितवर्धक ठरतात, तर काहीवेळा मत्स्यप्रजातींच्या जीवावर उठतात. ‘निळ्या देवमाशाच्या शोधात’ या लेखमालिकेमधून आपण या सहसंबंधाचा उलगडा करणार आहोत.
 
निळाशार पसरलेला दर्याराजा आणि त्याच्या लाटांवर हिंदोळे खात मार्गक्रमण करणार्‍या कोळ्यांच्या बोटी असे दृश्य आपण सर्वांनी पाहिले असेल. किनार्‍यावर शांतपणे उभे राहून वा नारळी-पोकळीच्या बागेत मस्तपणे वाळूत बसून असे दृश्य पाहणे, हा एक नयनसुख देणारा अनुभव. परंतु, याच निळ्याशार दर्या राजाच्या अंतरंगात काय काय आहे, हे जर आपण अभ्यासू लागलो, तर बुद्धी स्तंभित होईल, अशी विविध प्रकारची जैवविविधता आणि नानाविध नैसर्गिक साधने त्याच्या पोटात दडलेली दिसून येतील. दोस्तहो, आज या लेखमालिकेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की, मासेमारी आणि जैवविविधतेमध्ये असलेला सहसबंध. या महासागरात विचरण करणारे अजस्र जीव हे कशा स्वरूपात आपल्या आहार-विहार आणि सवयीप्रमाणे महासागरी अन्नसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्याविषयी. त्याचबरोबर मासेमारी करताना आपण कशा स्वरूपात सकारात्मक वा नकारात्मकरित्या या अजस्र जीवांवर परिणाम करतो त्याबद्दल अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील वस्त्र आणि निवारा ही गोष्ट व्यक्ती आणि समाजानुरूप बदलत असते. परंतु, यातील अन्न ही आपली अशी गरज आहे की, जी स्थल आणि काळ कितीही बदलली तरी मूलभूत स्वरूपात बदलत नाही. आपण शाकाहारी असो वा मांसाहारी परंतु शरीर नीट व्यवस्थित चालू राहावे, म्हणून आपणास सकस आणि परिपूर्ण आहाराची गरज असते. प्रथिने वा प्रोटिन हे या आहारातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. अमेरिकेची अन्न आणि शेती संशोधन संस्थेच्या 2009 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जगभरातील सुमारे दहा कोटींपेक्षा अधिक लोकांच्या प्रथिनांची गरज ही प्रामुख्याने फक्त समुद्री मासे आणि मत्सप्रक्रिया केलेले अन्न यांच्या माध्यमांमधून पूर्ण होते. मागणी तसा पुरवठा या वाणिज्य शाखेच्या नियमानुसार एवढी प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणात विविध समाजघटक आपल्या आपल्या पद्धतीने मासेमारी करत असतात. 1960च्या पूर्वी ही मासेमारी बहुसंख्य वेळा पारंपरिक ज्ञान आणि मासे पकडण्याच्या वाडवडिलांच्या अनुभवानुसार सिद्ध होत असे. परंतु, विज्ञानाची चक्रे जशी वेगाने फिरू लागली, तशी मासेमारी करण्याची पद्धती, हत्यारे आणि मत्स्य तंत्रज्ञान यांत बदल झाला. मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय न राहता, त्याची जागा फायदेवादी धोरण आणि अधिकाधिक अर्थार्जन या दिशेने सुरू झाली.
 
अर्थार्जन होण्यासाठी मासेमारी करणारे कोणी असो, एखादा कोळी बांधव असो वा मोठे मोठ्या व्यावसायिक व्यापारी संघटना काही बाबी या सर्वत्र समानतेने दिसून येतात. त्यातील सगळ्यात जुजबी बाब म्हणजे ‘कुटा’ वा ‘इूलरींलह’ ही होय. मासेमारी करणारी व्यक्ती कोणी असो वा त्यांची पद्धत काही असो, नियोजनशून्य पद्धतीमुळे मासेमारी करताना जे अनावश्यकरित्या जाळ्यात पकडले जाते वा फेकले जाते, अशा सगळ्या सागरी संसाधनाचा अंतर्भाव ’कुटा’ वा ’इूलरींलह’ या परिभाषेत करता येईल. कुटा म्हणून जाळ्यात कळत-नकळत काय पकडले जाते वा फेकले जाते, याची जर आपणास एक झलक पाहायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला मासेमारी बांधवांसोबत मासेमारी करण्यासाठी एखाद्या दिवशी समुद्रात वा खाडीत जावे लागेल. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे जेव्हा एखादी मासेमारी करणारी बोट किनार्‍यावर लागते, तेव्हा बोटीतून उतरवलेले मासे पाहणे. खाण्यासाठी पूरक ठरतील अशा आकारचे मासे जाळ्यात असतील, तर ठीक आहे. परंतु, बर्‍याच वेळा बाजारात अशाच माशांचा भरणा जास्त असतो की जे मासे प्रमाणित वा गरजेपेक्षा कमी आकाराचे आणि वजनाचे असतात. बहुसंख्य वेळा आपणास याची जाणीवच नसते की, एखादा मासा वा सागरी जीव याचे प्रमाणभूत आकार वा वजन किती आहेे. याचीच आणखी एक बाजू म्हणजे, खाण्यायोग्य नसलेले सागरी जीव मासेमारीच्या जाळ्यात अडकतात. जसे की, विविध सागरी शंख-शिंपले, स्पॉज आणि समुद्री सर्प. तर कधी कधी याच मासेमारीच्या जाळ्यात अडकतात समुद्री कासवे आणि सागरी सस्तन प्राणी. देवमासे आणि डॉल्फिन असे सागरी सस्तन प्राणी बहुधा मासेमारीच्या जाळ्यात कळत-नकळत अडकले जातात, तर कधीकधी चुकीच्या प्रवृतीला बळी पडून मुद्दाम पकडले जातात.
 
समुद्री कासवे
 
जगभरात अथांग पसरलेल्या सागरी क्षेत्रात सात समुद्री कासव प्रजाती आढळून येतात. ऑलिव रीडले, लेदर-बॅक, सी ग्रीन, लॉगर हेड आणि हॉक्सबिल या पाच सागरी कासव प्रजाती भारतीय मुख्य भूमीचे समुद्री किनारे, सागरी प्रदेश, मुख्य बेटे आणि खाडी तसेच नदीच्या जवळ आढळत असल्याच्या शास्त्रीय नोंदी आहेत. कॅम्प रीडले आणि फ्लॅट बॅक समुद्री कासवे याच्या खात्रीदायक नोंदी अजून आपल्या येथे झालेल्या नाहीत. समुद्री कासवे ही सागरी अधिवासात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सागरी वनस्पती आणि शैवाल याचे बीजप्रसरण, पाठीचा कणा नसलेले कित्येक लहान-मोठे सागरी जीव हेदेखील फार मोठा पल्ला या कसवांच्या मदतीने पार पाडतात. सागरी अधिवास पोषक करेल, अशा सेंद्रीय घटकाची देवाणघेवाण समुद्री कासवे आपल्या पूर्ण जीवनचक्रात यशस्वी पद्धतीने पार पाडतात. एखादा जीव जेवढा प्रदीर्घ जीवन जगतो, तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका तो तेथील अधिवास आणि अन्नसाखळीमध्ये पार पडतो. समुद्री कासव हा त्यामधीलच एक प्राणी आहे.
 
 
2010 मध्ये ब्रायन पी. वॉलिस आणि इतर संशोधक मंडळींनी एक शोधनिबंध प्रकाशित केला होता. साल 1990 ते 2008 या कालखंडात जगभरात सुमारे 85 हजारांपेक्षा अधिक सागरी कासवे ही मासेमारी करताना जाळ्यात अडकली गेली. ‘कुटा’ वा ‘इूलरींलह’ या संकल्पनेच्या खाली झालेली ही संशोधकीय नोंद म्हणजे एखाद्या बुद्धिनिष्ठ मानव समूहाला बसलेला जबरदस्त वैचारिक हादरा होय. मासेमारी करण्याच्या नानाविध पद्धती आणि त्याला पूरक असे मत्सजाळ्याचे प्रकार आहेत. यातील गिल नेट, लॉन्ग लाईन आणि ट्राल नेट हे या कासव पकडीला मुख्य जबाबदार ठरणारे प्रकार. या संशोधनातील एक विस्मयकारक बाब काय असेल, तर ती ही की सुमारे जाळ्यात अडकलेली 85 हजार समुद्री कासवे हा आकडा खात्रीदायक स्वरूपात नोंद झालेल्या मासेमारी माहितीच्या आधारे असला, तरी हे प्रमाण ज्याची कधीच नोंद होत नाही, अशा मासेमारीशी तुलना करता फक्त एक टक्का एवढेच आहे. जगभरात आजदेखील किती प्रमाणात किती पद्धतीने कोणते मासे पकडले जातात, याचे संपूर्ण खात्रीदायक आकडे उपलब्ध नाही. याचे मुख्य कारण काय असेल, तर सर्वत्र विखुरलेले छोट्या आणि पारंपरिक मासेमारीचे जाळे. आजदेखील खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी समाज जगभरात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो, मात्र, बर्‍याच वेळा असे मासेमारीचे प्रकार असतात. ज्यासाठी कायदेशीररित्या नोंद करावे लागते. मासेमारीच्या अजून काही पद्धती आणि कुटा यांच्या सहसंबंधाच्या अजून काही मुद्द्यांचा ऊहापोह करूया या लेख मालिकेच्या पुढील भागात. (क्रमश:)
 

प्रदीप चोगले


(लेखक ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया’ या संस्थेत सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)